लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : वडगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे काम रखडले होते. प्रशासकीय काळात हे काम मार्गी लावले असले तरी पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत असल्यामुळे चालत अगर दुचाकीवरून येताना कसरत करावी लागत आहे. तरी बाजार समितीने प्रवेशद्वार खुले करावे, अशी मागणी शेतकरी, व्यापारी यांच्यातून होत आहे.
वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून भाजीपाला, धान्य खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होते. बाजार समितीच्या माध्यमातून कासवगतीने विकासकामे सुरू आहेत. गतवर्षी सभासदनियुक्त संचालक मंडळाने प्रवेशद्वार करण्याचे काम सुरू केले होते. मात्र, हे काम रखडले होते. नंतर आलेल्या प्रशासकीय मंडळाने कमानीचे काम सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे बाजार समितीत प्रवेश करण्यासाठी कच्चा रस्ता करण्यात आला आहे. यातून ये-जा केल्यामुळे हा रस्ता चिखलयुक्त झाला आहे. कच्च्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत अक्षरशः फूटभर खड्ड्यांच्या रस्त्यातून चिखलातून वाट काढत यावे लागते. रस्ता पाऊस पडल्यानंतर खराब होत असल्यामुळे शेतकरी, व्यापारी यांना येणे अवघड होऊन बसते. बाजार समितीत जावे लागत आहे. बाजार समितीला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासकीय मंडळाने लक्ष द्यावे आणि प्रवेशद्वार खुले करावे, अन्यथा व्यापारी, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
.................
पेठवडगाव : वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशा पर्यायी रस्त्यावरून ये-जा करावी लागते, तर दुसरे छायाचित्र काम पूर्ण झालेल्या प्रवेशद्वाराचे. (छाया - क्षितिज जाधव फोटो )