ईपीएस पेन्शनरांचा भाजप कार्यालयावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:34+5:302021-06-30T04:16:34+5:30
कोल्हापूर : गेली दहा वर्षे अनेक प्रकारची आंदोलने करूनही पेन्शन वाढ होत नसल्याने वैतागलेल्या पेन्शनरांनी आता थेट भाजप कार्यालयाकडेच ...
कोल्हापूर : गेली दहा वर्षे अनेक प्रकारची आंदोलने करूनही पेन्शन वाढ होत नसल्याने वैतागलेल्या पेन्शनरांनी आता थेट भाजप कार्यालयाकडेच मोर्चा वळवला आहे. सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली येत्या १५, १६, १७ असे तीन दिवस राज्यभर हे आंदोलन होत आहे, असा निर्णय पेन्शनर्स असोसिएशनचे आप्पा कुलकर्णी, प्रकाश जाधव पत्रकाद्वारे कळवला आहे.
देशात गेली १० ते १२ वर्षे ईपीएस ९५ पेन्शनर अनेक मार्गाने मोर्चे, आंदोलने, रेल रेको, रास्ता रोको, उपोषणे, दिल्लीत दहावेळा धरणे व बेमुदत आंदोलन यांच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण तरीही केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही. तीन हजार पेन्शन व महागाई भत्ता असा देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देऊनदेखील सरकार त्याची अंमलबजावणीस टाळाटाळ करत आहे.
सरकारच्या या दिरंगाईचा निषेध म्हणूनच भाजप कार्यालयावर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आखलेल्या नियोजनात कोल्हापूर व सोलापूर १५, सांगली व रत्नागिरी १६, सातारा व कणकवली १७ असे पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाचे नियोजन आहे.