आज निवडणूक झाली तरी शिवसेना एकट्यानं १५० जागा जिंकेल, संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:26 PM2023-03-01T14:26:19+5:302023-03-01T14:27:24+5:30
आम्ही मुलीचं लग्न केलं तरी नोटीस मिळते. पण आम्ही पळालो नाही. २०२४ साली सगळे हिशेब चुकते होणार आणि दिल्लीत आमचं राज्य येणार, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
कोल्हापूर-
आम्ही मुलीचं लग्न केलं तरी नोटीस मिळते. पण आम्ही पळालो नाही. २०२४ साली सगळे हिशेब चुकते होणार आणि दिल्लीत आमचं राज्य येणार, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते गडहिंग्लजमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होते. तसंच राज्यात आज निवडणूक झाली तरी शिवसेना एकट्यानं १५० जागा जिंकेल असाही विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
"मोदींचे मित्र म्हणून अदानींना नोटीस मिळत नाही. पण आमच्या आमदारांना आणि मला नोटीस मिळते. आज पंतप्रधान मोदींनाही उद्धव ठाकरे हे आव्हान वाटताहेत. त्यामुळेच शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र रचलं गेलं आहे. पण सच्चा शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभा आहे आणि हिच खरी आमची ताकद आहे", असं संजय राऊत म्हणाले.
खोके मिळाले, पण आम्ही तुम्हाला प्रतिष्ठा दिली
गद्दारांनी पाठित खंजीर खूपसला आणि शिवसेना फोडली. गद्दारांना खोके मिळाले असतील पण शिवसेनेनं त्यांना प्रतिष्ठा दिली होती हे ते आज विसरले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसंच गद्दारांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही आणि याची प्रचिती २०२४ मध्ये येईल, असंही ते पुढे म्हणाले.