कोरोनाचा वाढता संसर्ग रोखून बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर खाली आणण्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने रॅपिड अँटिजन टेस्ट मोहीम हाती घेतली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपासून ते अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक, व्यापारी बँका, पतसंस्था, सेवा संस्था, दूधसंस्था याठिकाणी काम करणाऱ्यांना ही टेस्ट करून घेणे अनिवार्य आहे. तर गर्दीच्या ठिकाणी ती सक्तीने केली जाते.
मात्र, ही टेस्ट केल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षण नसणाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर, आरटीपीसीआर चाचणीत हाच अहवाल निगेटिव्ह आल्याने या टेस्टसंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. थोडासा ताप आणि अंगदुखी असणाऱ्या रुग्णांचे या टेस्टमध्ये अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने टेस्ट करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. मात्र, या वाढीमागे सदोष अँटिजन टेस्टच कारणीभूत ही टेस्ट करणाऱ्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे ही सदोष अँटिजन टेस्ट तत्काळ थांबवून आरटीपीसीआर टेस्ट करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.