सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी - हरिष भालेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:15 AM2018-11-27T11:15:43+5:302018-11-27T11:16:57+5:30
देशात उच्चप्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व प्राचार्य डॉ. हरिष भालेराव
कोल्हापूर : देशात उच्चप्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी सोमवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मानव्यशास्त्र अधिविभागातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. डॉ. भालेराव म्हणाले, नागरिकांना मुक्त वातावरणात जीवन जगता आले पाहिजे. यासाठी मूलभूत हक्कांची गरज असते. प्रत्येक भारतीयाचे राहणीमान उंचावून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि त्यांच्या मनात उच्चनीचतेची, परस्परांबद्दल श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना निर्माण न होऊ देणे या गोष्टी संविधानाला अभिप्रेत आहेत.
डॉ. शिर्के म्हणाले, संविधान हे केवळ पुस्तक नसून बाबासाहेबांनी या देशाला दिलेला मानवी मूल्यांचा दस्तावेज आहे. यासंदर्भात जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. या कार्यक्रमात संविधान दूतांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, प्रमोद वासंबेकर,के. डी. सोनवणे, आर. जी. सोनकवडे, प्रा. शोभा शेटे, पी. एस. पांडव, आनंद खामकर, सचिन देठे उपस्थित होते. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. वैभव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी आभार मानले.
भालेराव म्हणाले
* राज्याने कसे वागावे, हे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. ती राज्याची धोरणांबाबतची नैतिकता आहे.
* विकास, चौकसबुद्धी, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देणारी आपली मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
* धोरणे आखताना या तत्त्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
शिवाजी विद्यापीठात सोमवारी संविधानदिनानिमित्त प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांचे व्याख्यान झाले.