ऑक्सिजनअभावी माजी सैनिकाचा हॉस्पिटलमध्ये तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:24+5:302021-05-03T04:18:24+5:30
कोल्हापूर : राज्यभर ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतानाच ऑक्सिजनअभावी कोल्हापुरात रंकाळा टॉवर परिसरातील हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय कोरोनाग्रस्त माजी सैनिकाचा तडफडून ...
कोल्हापूर : राज्यभर ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतानाच ऑक्सिजनअभावी कोल्हापुरात रंकाळा टॉवर परिसरातील हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय कोरोनाग्रस्त माजी सैनिकाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. मृत करवीर तालुक्यातील गिरगाव येथील रहिवासी आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वेळेवर ऑक्सिजन पुरवला नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा असतानाही तो जोडणी करताना हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.
कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याचा विश्वास दिला असताना दुसरीकडे काही वेळातच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
गिरगाव येथील माजी सैनिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना दि. २६ एप्रिल रोजी सकाळी रंकाळा टॉवर परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. शनिवारी सकाळी त्यांंना जोडलेला ऑक्सिजन संपला, रुग्णाने ऑक्सिजनअभावी दम लागत असल्याचे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने संबंधित रुग्णाची तडफड सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची ऑक्सिजन आणण्यासाठी धावाधाव केली. सुमारे ४० मिनिटांनी ऑक्सिजन सिलिंडर आणले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी व्यथा मांडली.
घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे व त्यांच्या पथकांनी, तसेच पोलिसांनी तातडीने हॉस्पिटलकडे धाव घेतली. घटनेची तपासणी केली. रुग्णाच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलसमोर गोंधळ घातला. पोलिसांनीही हॉस्पिटल आवारात प्रचंड फौजफाटा बंदोबस्ताकाठी होता.
ऑक्सिजन जोडणीतील हलगर्जीपणामुळे मृत्यू : उपायुक्त
दरम्यान, महापालिका उपायुक्त निखिल मोरे म्हणाले, शुक्रवारी सायंकाळीच संबंधित हॉस्पिटलने एजन्सीकडून ऑक्सिजनचा पुरेसा साठा घेतला होता, तो शनिवारी दुपारपर्यंत पुरेल इतका शिल्लक होता. हॉस्पिटल प्रशासनाचा ऑक्सिजन जोडणीतील हलगर्जीपणा झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सृकतदर्शनी दिसून येते. तरीही आम्ही डॉक्टर रिपोर्ट, पंचनामा करीत असून, चौकशीअंती दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.
ऑक्सिजन नियोजन बैठक सुरू असताना मृत्यू
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी सकाळी महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण करून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या दालनात जिल्ह्यातील ऑक्सिजन साठ्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी कवाळे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. दत्तात्रय कवितके, प्रांताधिकारी वैभव नावाडकर उपस्थित होते, त्यावेळी जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याचा विश्वास मंत्री पाटील यांनी दिला. बैठक सुरू असतानाच शहरातील एका हॉस्पिटलमध्ये माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले.