‘डीयूडीसी’ सोडविणार परीक्षाविषयक समस्या
By admin | Published: April 22, 2015 11:45 PM2015-04-22T23:45:20+5:302015-04-23T00:37:13+5:30
शिवाजी विद्यापीठ : परीक्षा विभागात अत्याधुनिक कक्षाचे उद्घाटन
कोल्हापूर : परीक्षा भवनमधील अत्याधुनिक ‘डिजिटल युनिव्हर्सिर्टी- डिजिटल कॉलेज’ (डीयूडीसी) कक्ष विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी मंगळवारी येथे केले. या कक्षाच्या माध्यमातून परीक्षाविषयक समस्या सोडविण्यात येतील, त्यांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी व्यक्त केला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा भवन क्रमांक एकमध्ये पहिल्या मजल्यावरील ‘डीयूडीसी’ कक्षाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. भोईटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डॉ. भोईटे म्हणाले, अगरवाल समितीच्या शिफारशींमध्ये संगणकीकृत प्रशासनास मोठे महत्त्व देण्यात आले आहे. डीयूडीसी कक्षामुळे या शिफारशीची पूर्तता होण्यास अधिक मदत झाली आहे.
परीक्षा नियंत्रक काकडे म्हणाले, डीयूडीसीमध्ये महाविद्यालयांच्या परीक्षाविषयक समस्या दूर करण्यासाठी स्वतंत्र संगणकसज्ज कक्ष आहे. परीक्षाविषयक इतर कामकाजासाठी १६ संगणक असलेली स्वतंत्र यंत्रणा विकसित केली आहे. यामुळे परीक्षाविषयक कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यास मदत होईल.
कार्यक्रमास बीसीयूडी संचालक डॉ. आर. बी. पाटील, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्र्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, आदी उपस्थित होते.
विशेष कार्य अधिकारी अश्विनी महाडेश्वर यांनी स्वागत केले. उपकुलसचिव जी. आर. पळसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
असा होईल उपयोग
निकाल पाहणे, परीक्षा अर्ज भरणे, परीक्षा अर्ज व निकालातील त्रुटी पाहणे, आदी बाबी विद्यार्थी स्वत: करू शकतील.
या कक्षातील डीयूडीसी प्रणालीद्वारे २००हून अधिक विविध
प्रकारचे रिपोर्ट उपलब्ध होतात. यांपैकी १५० रिपोर्ट हे महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहेत.
विद्यार्र्थी त्यांना मिळालेल्या लॉगीन पासवर्डद्वारे स्वत:ची माहिती स्वत: अपडेट करू शकतात.
असे आहे ‘डीयूडीसी’...
या कक्षात परीक्षेची नोंदणी ते निकाल असे संपूर्ण कामकाज होणार आहे. त्यासाठी १६ संगणक आणि १६ तज्ज्ञ कर्मचारी कार्यरत असतील. महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून घेण्यासाठी त्यांना विद्यापीठात आल्यानंतर या विभागातून त्या विभागात असे फिरावे लागणार नाही. महाविद्यालयीन कर्मचारी विद्यापीठात आल्यानंतर त्यांना संगणकावर त्यांच्या कामाची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आला आहे. त्यांना आवश्यक ते तांत्रिक साहाय्य देण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध असतील.