कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर महानगरपालिका प्रशासनाने बंदी घातली असून, या बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल महापालिकेच्या पथकांनी गेल्या दोन दिवसात दहा जणांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड केला.
कारवाई झालेल्यांमध्ये विश्वनाथ माळकर, सत्यम खडके, स्वप्नील चव्हाण, आदित्य भोसले, विशाल मेस्त्री, प्राजक्त यादव, विक्रम पाटणकर, अश्विन चौगुले, धनंजय पाडळकर, मनोहर ठोंबरे यांचा समावेश आहे. ही कारवाई बिंदू चौक, दसरा चौक, सासणे ग्राऊंड, शाहूपुरी पाचबंगला, महापालिका, लक्ष्मीपुरी आदी परिसरात करण्यात आली.
शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असूनही काही नागरिक सरळ रस्त्यावर पिचकाऱ्या मारतात. काही महाभाग तर दुचाकी चालवत असतानाच थेट थुंकतात. मागून कोणी वाहनधारक येत असेल याचाही ते विचार करत नाहीत. मावा, गुटखा, पान खाऊन नागरिक थुंकतात. त्यांच्यावर दंडाच्या कारवाईबरोबरच फौजदारी कारवाई सुद्धा करावी, अशी सूचना नागरिकातून केली जात आहे.