कोल्हापूर : महापालिका सिग्नल चौक ते इब्राहिम खाटीक चौक या रस्त्यावरील शेतकरी सेवा कापड केंद्र संचारबंदी काळात सुरू ठेवल्याबद्दल रविवारी या दुकानाला महापालिका परवाना विभागाच्यावतीने सील ठोकण्यात आले.
शहरात राज्य शासनाच्या आदेशानुसार धान्य लाईन, किराणा दुकान, भाजीपाला, बेकरी, दूध विक्रेते यांच्यासाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. अकरा वाजल्यानंतर केवळ औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवायची आहेत. तरीही शेतकरी सेवा कापड केंद्र सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
शहरात शासन निर्देशाचे पालन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पाच भरारी पथके स्थापन केली असून, या पथकामार्फत विविध ठिकाणी फिरती करून तपासणी केली जात आहे. या पथकात पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पथक अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. रविवारची कारवाई परवाना अधीक्षक राम काटकर यांनी केली.