Kolhapur: ‘भूमी अभिलेख’च्या लुटीत शेतकऱ्यांची फरफट, अधिकारीच सापडल्याने लाचखोरी चव्हाट्यावर
By भीमगोंड देसाई | Published: January 5, 2024 05:07 PM2024-01-05T17:07:42+5:302024-01-05T17:08:45+5:30
पैसे घेण्यासाठीही शौचालयाचा वापर
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : भूमी अभिलेखचे जिल्ह्याचे प्रमुखच कार्यालयात लाच घेताना सापडल्याने भूमी अभिलेखमधील चोर बाजार चव्हाट्यावर आला आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब, सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांची फरफट होत आहे. त्याची कोणीही दाद घेत नसल्याने शेवटी तो प्रशासनातील लाचखोर अधिकारी, कर्मचारी किंवा एजंटास मागेल तितके पैसे देऊन काम करून घेतो. या लुटीतील प्रमुख सूत्रधार भूमी अभिलेख कार्यालय परिसरातील झेरॉक्स सेंटरवाला असतो. या सेंटरचे मालक आणि कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असतात. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील नक्कल काढण्यासाठीचा किंवा मोजणीचा अर्ज द्यायचे की नाही, हे तो झेरॉक्स चालकच ठरवत असल्याच्याही तक्रार आहेत.
भूमी अभिलेख कार्यालयात आल्यानंतर त्याच दिवशी काम झाले, असे फार क्वचित वेळा होते. मोजणीचा अर्ज करण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासोबत जोडण्यासाठीचा नकाशा आणि नऊ चार नऊ तीन काढण्यासाठी झेरॉक्स चालकातर्फे खासगी उमेदवारांकडे जावे लागते. तो सुरुवातीला आता नाही वेळ लागेल उद्या देतो, अशी उत्तरे देतो. अर्जंट आहे, असे सांगितल्यानंतर शोधाशोध करतो.
काही वेळानंतर बाहेर येऊन जुने रेकॉर्ड सापडत नाही, असे सांगतो. मग काय असेल ते देतो, असे म्हटल्यानंतर नक्कल काढून देतो. यासाठी १०० ते २०० रुपये उकळतो. काही वेळा कोल्हापूरहून रेकॉर्ड आणायचे आहे, असे सांगून ५०० ते हजार रुपयेही घेतले जातात. जमिनीची फाळणी करणे, तक्रारीची सुनावणी घेऊन निकाल देण्यासाठी मालमत्ता किती किमतीची आहे, त्यावरून लाच घेतली जाते. लाच दिली की साध्या मोजणीच्या पैशात अती तातडीची मोजणी करून दिली जात आहे.
कार्यालयीन चुकीचा मनस्तापही
मालमत्ता पत्रकातील नाव चुकवणे, अंतर बदलणे अशा कार्यालयीन चुकीचा मनस्तापही संबंधित मालमत्ताधारकांना होत आहे. स्वत:ची चूकही दुरुस्त करण्यासाठी अनेकवेळा हेलपाटे मारायला लावले जाते. यातूनही पैसे गोळा केले जात असल्याचा आरोप होत आहे.
स्वयंघोषित नियम
महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोजणीचे अर्ज स्वीकारायचे नाहीत, आवक-जावकमध्ये अर्ज नोंदणीसाठीही अधीक्षकाची परवानगी घेणे, मोजणीसाठी कोणाचा अर्ज स्वीकारायचा, याचे स्वयंघोषित नियम त्या कार्यालयातील अधीक्षक घेतात. वशिला असेल आणि पैसे मोजले की सर्व नियम शिथिल केले जातात.
पैसे घेण्यासाठीही शौचालयाचा वापर
कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा गर्दी अधिक असल्यास शौचालयात लाचेचे पैसे स्वीकारले जात आहेत. गडहिंग्लज भूमी अभिलेख कार्यालयात तर एक माजी साहेब ड्रॉव्हर उघडे ठेवायचे त्यामध्ये पैसे ठेवून गेले की ते नंतर मोजून खिशात घालत होते. त्यानंतर प्रकरण निर्गत करीत होते. कोल्हापुरात राहणारे अनेक अधिकारी, कर्मचारी चारचाकी वाहनातून रोज ये-जा करतात. हे अधिकारी सर्वाधिक वरकमाई करीत असल्याचा आरोप होत आहे.
सर्वाधिक प्रलंबित करवीर तालुक्यात
तालुकानिहाय मोजणीची प्रलंबित प्रकरणे अशी : करवीर : ५५५, हातकणंगले : ३६६, शिरोळ : २३४, कागल : ४१७, आजरा : ३२८, चंदगड : ९८, गडहिंग्लज : १६९, पन्हाळा : ४३५, शाहूवाडी : ४२४, राधानगरी : ०, भुदरगड : २२३, गगनबावडा : ७२.