नांदणी येथील शेतकरी म्हणतात, जय जवान, उत्स्फुर्त निधी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:21 PM2019-02-19T14:21:45+5:302019-02-19T14:25:38+5:30
माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली होती. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी किसानही पुढे सरसावला आहे. साखर कारखान्याला पुरविलेल्या उसाच्या टनामागील एक रुपया जवानांसाठी देण्याचे आवाहन नांदणी ता. शिरोळ येथील शेतकऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून उत्स्फुर्त निधी जमा होत आहे.
यड्राव : माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली होती. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी किसानही पुढे सरसावला आहे. साखर कारखान्याला पुरविलेल्या उसाच्या टनामागील एक रुपया जवानांसाठी देण्याचे आवाहन नांदणी ता. शिरोळ येथील शेतकऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून उत्स्फुर्त निधी जमा होत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नांदणी येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. प्रारंभी पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी येथील शेतकऱ्यांनी साखर कारखान्यास पुरविलेल्या उसाच्या प्रतिटन एक रुपया देण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या बैठकीला पोलीस निरीक्षक कटकधोंड, सरपंच विद्या संकेश्वरे, उपसरपंच मायगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
नांदणीच्या शेतकऱ्यांचा हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. देशाच्या रक्षणासाठी जवान रात्रंदिवस जागत असतात तसेच आपल्याच देशबांधवांना अन्नधान्य पुरवण्यासाठी किसानही रात्रंदिवस राबत असतो. परंतु त्यांच्यावर संकट आले की दु:ख व्यक्त करण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे हे दोन्ही घटक उपेक्षित राहतात. पुलवामा हल्ल्यामुळे ही भावना अधिक जाणवली, त्यातून संकटग्रस्त जवान आणि शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्यासाठी नांदणी येथील शेतकरी पुढे सरसावले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जाळे देशभर असल्याने या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. संकलित होणाऱ्या या निधीतून वीरमरणप्राप्त जवानांचे कुटूंबिय, जखमी जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
नांदणीच्या शेतकऱ्यांचा हा आदर्श उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचविण्यात येणार आहे. ज्या-त्या भागात निधी संकलन करून त्या-त्या भागातील संकटग्रस्तांना मदत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हा निधी शेतकऱ्यांच्याच प्रतिनिधीकडे संकलित करण्यात येणार असल्याने तो संकटग्रस्तापर्यंत निश्चिंतपणे पोहचू शकेल, याबाबत कोणासही शंका राहणार नाही, अशी चर्चा या बैठकीत झाली.
देशाचे रक्षणकर्ता व देशासाठी अन्नधान्य निर्माण करणारे दोन्ही देशसेवक उपेक्षित आहेत.परंतु शेतकऱ्यांनी जवानांसह आपल्या बांधवासाठी घेतलेला हा उपक्रम मोठा आहे. सर्वसामान्यांना एखाद्या मोठ्या संकटप्रसंगी मदत करण्याची इच्छा असते, परंतु ती कोठे करावी याची माहिती त्यांना नसते. त्यामुळे या उपक्रमामार्फत सर्वजण उस्फुर्तपणे मदत करत देशबांधवांसाठी पुढे सरसावले आहेत.
नांदणी येथील शेतकरी बांधवांनी देशप्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे, संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम लवकरच देशभर पोहचेल अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सागर संभूशेटे यांनी व्यक्त केली.