कुरुंदवाड : पंचगंगा नदीकाठावरील शेतीपंपाची वीज त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी कुरुंदवाड व शिरढोण येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अधिकारी कार्यालयात नसल्याने शेतकरी व कार्यकर्ते महावितरणच्या कट्ट्यावरच ठिय्या मारून घोषणाबाजी केली. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दुपारी उपकार्यकारी अभियंता अभिजित देवाळे येताच त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. अधिकारी देहाळे यांनी आज मंगळवारपासून विद्युतपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. आंदोलनाचे नेतृत्व विश्वास बालीघाटे यांनी केले.
जुलैमध्ये आलेल्या महापुरात शेतीबरोबर महावितरणचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप महावितरणने ट्रान्सफॉर्मर न बसविल्याने पाण्याअभावी महापुरात वाचलेली व नव्याने पेरलेली पिके वाळत आहेत. त्यामुळे शिरढोण व कुरुंदवाड भागातील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनात रमेश भुजुगडे, रवी गायकवाड, बंडू उमडाळे, बाबासाहेब सावगावे, संजय मालगांवे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो - २००९२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - कुरुंदवाड महावितरण कार्यालयात अधिकारी नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडून बसले होते.