आपल्याकडे महोगनी या विदेशी वृक्षाच्या दोन प्रजाती आढळतात. या दोन्ही प्रजातींचे जातीविषयक शास्त्रीय नाव आहे ‘स्विटेनिया’. डच वनस्पतीशास्त्रज्ञ ‘गेरार्ड स्वीटन’ यांच्या गौरवार्थ व स्मरणार्थ या जातीचे नामकरण ‘स्विटेनिया’ असे करण्यात आले आहे. याची पहिली प्रजात आहे ‘महोगनी’. या प्रजातीचे शास्त्रीय नाव ‘महोगनी’ असे ठेवण्यामागे एक लहानशी कथा आहे. नायजेरिया देशातील थोरुबा या जमातीचे लोक गुलाम म्हणून जमैका देशात नेण्यात आले होते. त्यावेळी जमैकामधील एक वृक्ष त्यांना त्यांच्या देशातील ‘खाया’ या वृक्षासारखा वाटला. त्यांनी या वृक्षाला आपल्या देशातील वृक्षाचे बोलीभाषेतील नाव दिले ‘मोगान्वो’. पुढे पुढे या नावाचा अपभ्रंश झाला ‘मोगानी’ आणि नंतर त्याचे अमेरिकन लोकांनी नाव केले ‘महोगनी.’ यामुळे या वृक्षाचे शास्त्रीय नाव बनले ‘स्विटेनिया महोगनी’. या प्रजातीचे मूळस्थान आहे वेस्ट इंडिज व फ्लोरिडा हे देश. या प्रजातीच्या वृक्षांना इंग्रजीत ‘स्पॅनिश महोगनी’, ‘वेस्ट इंडियन महोगनी’, ‘जमैकन महोगनी’, ‘क्युबेन महोगनी’, ‘मेदिरा रेडवूड ट्री’ अशी प्रचलित नावे आहेत.दुसऱ्या प्रजाती वृक्षाचे शास्त्रीय नाव आहे ‘स्विटेनिया मॅक्रोफायला’. या प्रजाती वृक्षाची पाने तुलनेत आकाराने मोठी असल्याने त्याचे प्रजातीविषयक नाव ‘मॅक्रोफायला’ असे ठेवण्यात आले आहे. या प्रजातीचे मूळस्थान आहे मेक्सिको व ब्राझील. या प्रजातीच्या वृक्षांना इंग्रजीत ‘बास्टर्ड महोगनी’ व ‘होंडूरास महोगनी’ म्हणतात. या दोन्ही प्रजातींना भारतात बोलीभाषेत कोणतीही स्थानिक नावे नाहीत. दोन्ही प्रजाती वृक्षांना ‘महोगनी’ हेच नाव आहे. या दोन्ही प्रजातींचे वृक्ष उष्णकटीबंधीय अमेरिका खंडातील देशांत नैसर्गिकपणे जंगल-वनांत वाढलेले आढळतात. जगभरातील जवळपास इतर सर्व देशांत दोन्ही प्रजातींचे वृक्ष बागेत, रस्त्यांच्या कडेने लावलेले दिसून येतात.भारतात इंग्रजांनी ‘स्विटेनिया महोगनी’ वृक्षांची लागवड प्रथमत: १७९५ मध्ये कोलकातामध्ये केल्याची नोंद आढळते. त्यावेळी जमैका येथून त्यांची काही रोपे आणून, ही रोपे कोलकाताच्या सुप्रसिद्ध ‘इंडियन बॉटनिकल गार्डन’मध्ये लावली होती. त्यानंतरही वेस्ट इंडिजमधून बियाणे आणून भारतात विविध ठिकाणी वनविभागाने याची रोपे लावण्याचे यशस्वी प्रयत्न केले होते. इंग्रजांनी इ. स. १८७२ मध्ये होंडूरास येथून ‘स्विटेनिया मॅक्रोफायला’ या वृक्ष प्रजातीची रोपे आणून दक्षिण भारतातील जास्त पाऊस पडणाºया भूप्रदेशात त्यांची लागवड केली. आज भारतात सर्वत्र महोगनी वृक्षाच्या दोन्ही प्रजातींची लागवड केलेली दिसून येते.महोगनीच्या दोन्ही प्रजातींमध्ये काही फरक आहेत. बाकी सर्व गुणधर्म समान आहेत. स्विटेनिया महोगनी प्रजातीचा वृक्ष आकाराने व उंचीने थोडा लहान व पानेही आकाराने दुसºया प्रजातीपेक्षा लहान असतात. महोगनीचे वृक्ष कडूलिंबाच्या कुळातील म्हणजेच ‘मेलिएसी’ या कुळातील आहेत. हे वृक्ष दुरून हुबेहूब कडूलिंबाच्या वृक्षांसारखे दिसतात. महोगनीच्या पर्णिका कडूलिंबाच्या पर्णिकांप्रमाणेच दिसतात; पण पानांच्या कडा अखंड असतात. कडूलिंबाप्रमाणे कातरलेल्या व दातेरी नसतात.महोगनीचा मोठा वृक्ष १२ ते २२ मीटर उंच वाढतो. खोडाचा व्यास एक ते दीड मीटर इतका असतो. खोडाची साल काळसर-तपकिरी रंगाची असून, ती भेगाळलेली व खवलेदार असते. फांद्या अनेक, पसरणाºया असल्याने त्याचा पर्णसंभार दाट, भव्य छत्रीच्या किंवा घुमटाच्या आकाराचा, मोहक व आकर्षक असतो. हा वृक्ष त्याच्या मूळस्थानी सदाहरित असला, तरी भारतात मात्र या वृक्षाची पानगळ फेब्रुवारी-मार्च महिन्यांत कमी अधिक काळासाठी होते. इतरवेळी मात्र या वृक्षापासून दाट सावली मिळते. पाने एकाआड एक, संयुक्त प्रकारची असून, १० ते २० सें.मी. लांब असतात. पाने चमकदार, चकचकीत, गर्द हिरवी असून, एक सम पिच्छाकृती असतात व त्यावर ४ ते १० पर्णिका असतात. पर्णिका लांबट, टोकदार व थोड्या वाकड्या वळलेल्या असतात.मार्च-एप्रिल महिन्यांत नवीन पालवीबरोबरच फुलांचा बहार येऊ लागतो. फुले अगदी लहान, ४ ते ६ मि.मी. व्यासाची, हिरवट-पिवळसर असून, ती पानांपेक्षा कमी लांबीच्या, अनेक शाखा असलेल्या तुºयांमध्ये येतात. फुलांचे तुरे पानांच्या बेचक्यातून तयार होतात; पण पानांच्या दाटीमुळे हे तुरे पटकन नजरेस पडत नाहीत. फुले नियमित व द्विलिंगी असून, अनाकर्षक असतात. निदलपुंज पाच दलांनी बनलेला. पाकळ्या पाच, सुट्या. पुंकेसर दहा, सर्व तळाशी एकत्र जोडलेले असतात आणि त्यापासून एक लहान पुंकेसर नळी तयार होते. बिजांडकोश ४ ते ५ कप्पी, परागवाहिनी एक, जाड, आखूड, तर परागधारिणी जाड व गोलाकार. फळे हिवाळ्यात तयार होऊ लागतात व वर्षभर झाडावर राहतात. फळ लांबट-गोलाकार, अंडाकृती, ७ ते १५ सें.मी. लांब व ७.५ सें.मी. रुंद असून, टणक, लाकडासारखे, तपकिरी रंगाचे, आखूड देठाचे असते. फळांमध्ये मध्यभागी लांबट-गोलाकार, काहीसा पंचकोनी लाकडी स्तंभ असतो. त्यावर असंख्या बिया अगदी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने गोलाकार रचनेत बसलेल्या असतात. बिया चपट्या, पंखधारी व तपकिरी रंगाच्या, साधारणपणे ६ सें.मी. लांब असतात. प्रत्येक बियांच्या टोकाला सुमारे ५ सें.मी. लांबीचा चपटा व लांबट पंख असतो. बियांचा प्रसार वाºयामार्फत होतो. बियांपासून रोपे तयार करता येतात. महोगनीचे लाकूड कठीण, टिकाऊ व सुंदर असल्याने लाकडाचा उपयोग कपाटे, शोभिवंत लाकडी वस्तू व खेळणी बनविण्यासाठी सर्वत्र केला जातो. हे लाकूड उत्तम प्रकारच्या फर्निचरसाठी जगप्रसिद्ध आहे. जहाजे व बोटी-होड्या तयार करण्यासाठी महोगनीच्या लाकडाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात करतात. ब्राझीलमध्ये खोडावरील सालीचा कातडी कमविण्यासाठी वापर करतात. साल व डिंक औषधात वापरतात.महाराष्ट्रात सर्वत्र महोगनी वृक्षांची लागवड केलेली दिसून येते. महोगनीचे वृक्ष कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने इचलकरंजी, जयसिंगपूर, वारणानगर या ठिकाणी आहेत. कोल्हापूर शहरात महोगनी वृक्षाच्या दोन्ही प्रजाती आहेत. लहान पानांचे महोगनी वृक्ष शिवाजी विद्यापीठाच्या आवारात आहेत, तर मोठ्या पानांचे महोगनी वृक्ष टाऊन हॉल बागेत, नागाळा पार्क येथील पाटबंधारे खात्याच्या आवारात, तसेच ताराराणी विद्यापीठासमोरील रस्त्याच्याकडेने व इतरत्रही अनेक ठिकाणी आहेत.डॉ. मधुकर बाचूळकर
आकर्षक पर्णसंभाराचा ‘महोगनी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:28 AM