शिरोळमधील कॅन्सरची भीती अवास्तव-३ लाख १० हजारपैकी केवळ १४४० संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 02:26 PM2018-11-27T14:26:59+5:302018-11-27T14:28:30+5:30
शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण असल्याची भीती अवास्तव असल्याची आकडेवारी समोर येत असून आतापर्यंत ३ लाख १० हजार ग्रामीण लोकसंख्येपैकी केवळ १४४० जणांची ‘संशयित’ म्हणून नोंदणी करण्यात आली आली आहे.
- समीर देशपांडे
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण असल्याची भीती अवास्तव असल्याची आकडेवारी समोर येत असून आतापर्यंत ३ लाख १० हजार ग्रामीण लोकसंख्येपैकी केवळ १४४० जणांची ‘संशयित’ म्हणून नोंदणी करण्यात आली आली आहे. येत्या महिनाभरात या सर्वांची सविस्तर तपासणी झाल्यानंतर हा आकडा आणखी मोठ्या प्रमाणावर खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील दहा हजारांहून अधिक नागरिकांना कॅन्सरची लागण झाल्याची चर्चा आहे, अशा पद्धतीच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे शिरोळ तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले. सर्वच लोकप्रतिनिधींही ही बाब गांभीर्याने घेतली. परिणामी गेल्यावर्षी जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला २७ लाख ८० हजारांचा निधी देत या ठिकाणी सर्वेक्षणाच्या सूचना केल्या.
त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपूर्वी हे सर्वेक्षण झाले. जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या वगळता उर्वरित ३ लाख १० हजार महिला, पुरुष ग्रामस्थांची आशांनी जावून तपासणी केली आहे. त्यामध्ये १४४० जण ‘कॅन्सरचे संशयित’ म्हणून नोंद करण्यात आले आहेत. २९० आशांनी हे काम केले आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते.
आता येत्या महिनाभरामध्ये शिरोळ तालुक्यात पाच ठिकाणी तपासणी शिबिरे घेण्यात येणार असून त्यामध्ये कॅन्सरतज्ज्ञांना बोलावून या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करण्यात येणार असून यातून कॅन्सरग्रस्तांचा नेमका आकडा समोर येणार आहे.
कॅन्सर रुग्णांची संख्या शिरोळ तालुक्यात प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यासाठी रासायनिक शेती आणि भाजीपाल्यांवर केली जाणारी औषधांची फवारणी कारणीभूत असल्याचा आरोप केला जात होता. दरम्यान, कृषिअभ्यासक अजित नरदे यांनी कॅन्सरची भीती अवास्तव असून सेंद्रीय शेती करणाऱ्यांनी हा बागुलबुवा उभा केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी लवकरच स्पष्ट केली जाणार आहे.
सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात
या सर्वेक्षणामध्ये सर्व ग्रामस्थांना अंगावर गाठी आहेत का, याची विचारणा करण्यात आली. अनेकांनी गाठी असल्याचे सांगितले. मात्र, या सर्वच गाठी कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे संशयितांनीही घाबरण्याचे कारण नसल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी सांगितले. याबाबतची सविस्तर तपासणी झाल्यानंतरच त्याचा आकडा निश्चित होईल, असे ते म्हणाले.
‘टाटा’कडूनही तपासणी
टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरनेही शिरोळ तालुक्यातील १३ गावांचे सर्वेक्षण केले असून त्यामध्येही जेवढी चर्चा सुरू आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याची गरज आहे
शिरोळ तालुक्यातील या कॅन्सरच्या भीतीची सर्वच लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. अगदी परवा जिल्ह्याच्या दौºयावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आमदार उल्हास पाटील यांच्याकडे याबाबत चौकशी केली. त्यामुळे जिल्हा परिषदेने तातडीने याबाबतची तपासणी शिबिरे घेऊन त्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.