कोल्हापूर : शहरात सकाळी व सायंकाळी चार तास कडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने धास्तावलेल्या वाहनधारकांनी रस्त्यावर येणेच कमी केले, परिणामी गेल्या चार दिवसांपेक्षा शनिवारी रस्त्यावरील वाहनांची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे; पण दिवसभर अत्यावश्यकच्या नावाखाली काही वाहने रस्त्यावरून धावत होती. शहरात प्रवेशणाऱ्या मार्गावर पोलिसांनी तपासणी यंत्रणा कडक केली होती. दिवसभर शहरातील सर्व दुकाने बंद राहिली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, शुक्रवारी शहरातील वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता त्याचा धसका सर्वसामान्यांनी घेतल्याचे दिसून आले. शहरात प्रवेशणाऱ्या सर्वच मार्गांवर पोलिसांच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत होती. सकाळी व सायंकाळी गर्दी होण्याच्या वेळेत रस्त्यावर नाहक फिरणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडे विचारपूस केली जात होती.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नाहक फिरणाऱ्यांची वाहने थेट जप्तीची मोहीम पोलीस खात्याने हाती घेतली. त्याचा धसका घेऊन शहरात नाहक फिरणाऱ्यांची वाहने मंदावल्याचे चित्र दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानकांसह रंकाळा, संभाजीनगर बसस्थानक दिवसभर सुनासुना होता. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आता प्रत्येकाच्या तोंडाला मास्क दिसू लागले आहेत.शहरात रंकाळा टॉवर, नवीन वाशी नाका, धैर्यप्रसाद चौक, शिवाजी पूल या ठिकाणी पोलीस कारवाई करीत वाहने जप्तीची कारवाई सुरू होती. या कारवाईत शनिवारीही दिवसभरात मोठ्या संख्येने वाहने जप्त केली. शिवाय दाभोळकर चौक, बिंदू चौक, सायबर चौक, दसरा चौक, ताराराणी चौक आदी ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहने तपासणी मोहीम होती घेतली होती.