पोलिसांच्या निष्क्रियतेचा ‘सत्कार’

By admin | Published: April 27, 2016 12:28 AM2016-04-27T00:28:34+5:302016-04-27T00:59:01+5:30

पेठवडगावात बंडखोर सेनेची गांधीगिरी : जमावबंदी भंगप्रकरणी सातजणांना अटक

'Felicitation' of inaction of police | पोलिसांच्या निष्क्रियतेचा ‘सत्कार’

पोलिसांच्या निष्क्रियतेचा ‘सत्कार’

Next

पेठवडगाव : वाढत्या चोरीच्या घटनेकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी बंडखोर सेनेने लक्षवेधी सत्कार आंदोलन केले. जमावबंदी आदेशामुळे हलगी, घुमके वाजवून चार आंदोलकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. नागरिकांनी गुलाबपुष्प देऊन या आंदोलकांचे स्वागत केले. पेठवडगाव व परिसरात गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रस्थ वाढले आहे. वडगावात एकाचवेळी आठ ठिकाणी दुकाने फोडली. याच पद्धतीने परिसरात मोटारसायकली, घरफोड्या, दुकाने फोडून चोऱ्या झाल्या. या प्रकारामुळे शहरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या चोऱ्यांचा तपास तातडीने व्हावा, पोलिसांनी निष्क्रिय राहू नये व घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशामुळे वडगाव पोलिसांनी बंडखोर सेनेच्या मोर्चास परवानगी नाकारली होती. त्यामुळे बंडखोर सेनेच्यावतीने चार कार्यकर्त्यांच्यावतीने सत्कार आंदोलन केले. हे आंदोलन होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावली होती. यासाठी आठ ते दहा पोलिसांचा बंदोबस्त होता.आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापासून करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी याठिकाणी निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, अर्जुन समुद्रे, गजानन धनवडे, प्रकाश बुचडे, पंडित बुचडे यांनी आंदोलन केले. दोन आंदोलकांनी मागण्यांचे फलक गळ्यात अडकवून, तर अन्य दोघे हलगी, घुमके वाजवत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. पोलिस ठाण्यासमोर पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन दिले व त्यांना बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी हार अर्पण करून आंदोलनाची सांगता केली. यावेळी चोरीचा तपास १५ दिवसांत करावा, गस्तीपथके नेमावीत, खासगी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करावा, तपासाची माहिती द्या, तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी जाधव यांनी चोरीचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्रीच्यावेळी पोलिसमित्रांच्या मदतीने गस्तीपथके तैनात केली आहेत. त्यामुळे सध्यातरी चोरीस आळा बसला आहे. झालेल्या चोऱ्यांचा तपास गतीने सुरू आहे. येत्या काही दिवसांत चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना निश्चित यश येईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)


आंदोलकांवर गुन्हा
जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी सात आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा मंगळवारी सायंकाळी पोलिसांत नोंद झाला. याबाबत पोलिस नाईक अनंत देसाई यांनी फिर्याद दिली. हलगी वादक, विनापरवाना बॅनर प्रिंट करून देणारा तसेच बेकायदेशीर आंदोलनास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे यांच्यासह शिवाजी आवळे, बाबा दगडू फाळके, अर्जुन शिवराम समुद्रे, गजानन शामराव धनवडे, पंडित आनंदा बुचडे, प्रकाश किसन बुचडे, नितीन राजन शेटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: 'Felicitation' of inaction of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.