अनावश्यक फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करा : जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:23 AM2021-04-25T04:23:31+5:302021-04-25T04:23:31+5:30
उदगाव : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासनाकडून जिल्हाबंदीची सुरुवात करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर ...
उदगाव : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासनाकडून जिल्हाबंदीची सुरुवात करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केलीच पाहिजे. जे नागरिक अनावश्यक फिरताना दिसून येत आहेत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच पोलिसांशी असहकार्य करणाऱ्या नागरिकांवर थेट गुन्हे दाखल करावेत, असे सक्त आदेश जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिले.
उदगाव (ता. शिरोळ) येथील चेकनाक्यावर जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी शनिवारी भेट दिली.
बलकवडे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिक सर्रासपणे शासनाची नियमावली तोडत आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करावी. येणाऱ्या वाहनांच्या कागदपत्राची पडताळणी करूनच त्यांना प्रवेश द्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी शिरोळ तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या कोरोना उपाययोजनाची माहिती दिली.
यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, अभिजित भातमारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट-
पोलिसांना उन्हाचा त्रास
चेकनाक्यावर दररोज २०ते २५ पोलीस तैनात आहेत. त्यांना उन्हाचा फटका बसत आहे. त्यांच्यासाठी मंडप व इतर सोयी तत्काळ करण्याच्या सूचना पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिल्याने पोलिसांचा त्रास कमी होणार आहे.
फोटो--उदगाव : येथील चेकनाक्याची माहिती घेताना जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे. शेजारी तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, शंकर कवितके, दत्तात्रय बोरीगिड्डे.