चित्तथरारक कसरतींनी ‘रिक्षा सुंदरी’ स्पर्धेत भरला रंग; शंभरहून अधिक रिक्षांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 05:32 PM2020-01-26T17:32:55+5:302020-01-26T17:54:37+5:30
प्रजासत्ताकदिनी रिक्षा सौंदर्य स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रासह सीमाभागाचे आकर्षण असलेल्या कोल्हापूरच्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत रविवारी प्रजासत्ताक दिनीमहाराष्ट्रासह कर्नाटकातील शंभरहून अधिक रिक्षा सहभागी झाल्या. चित्तथरारक कसरतींनी या स्पर्धेत रंग भरत उपस्थितांची वाहवा मिळविली.
निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य’स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकराच्या सुमारास स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. इतरवेळी रस्त्यावर दिसणाऱ्या रिक्षा थेट रॅँपवर आल्याने सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या अन तिथेच खिळून राहील्या. एखाद्या महागड्या चारचाकी वाहनात बसल्याचा अनुभव या रिक्षांच्या निमित्ताने अनेकांना आला.
प्रवाशांच्या सोयीसाठी पाण्याची बाटली, शीतपेये, वृत्तपत्रे, एलईडी स्क्रिन, ए.सी., दर्जेदार कुशन्स, अंतर्गत आकर्षक विद्युत रोषणाई, त्याचबरोबर रिक्षाच्या बाह्य भागावरील मॅगव्हील, बंपर्स, लाईट्स, आकर्षक रंगसंगती, लाकू ड व पितळी पत्त्यांवर केलेले नक्षीकाम यामुळे रिक्षा अधिकच सुंदर आणि खुलून दिसत होत्या. हौस म्हणून हजारो ते लाखो रुपये खर्च करुन सजावट केलेल्या या रिक्षांचा मेळा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत ही रिक्षा सुंदर स्पर्धा सुरु होती. याचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष राजू जाधव यांच्यासह सहकाºयांनी केले.