कोल्हापूर : फायनान्स कंपन्यांच्या अन्यायी कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘आरपीआय’च्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंपन्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.‘आरपीआय’च्या महिला आघाडी अध्यक्ष रूपा वायदंडे, प्रा. शहाजी कांबळे, संजय जिरगे, कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी टाऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली. सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे असेंब्ली मार्गावरून आलेला मोर्चा दुपारी महावीर गार्डनसमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. येथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.यावेळी बोलताना शहाजी कांबळे यांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या अन्यायी व्याज आकारणीमुळे, बेकायदेशीर कर्जवाटपामुळे आणि वसुलीवेळी होणाऱ्या दडपशाहीमुळे बचतगटातील कर्जदार महिलांचे जगणे अवघड बनले आहे. यांना या कंपन्यांच्या जाचातून बाहेर काढावेच लागणार आहे, अन्यथा येथून पुढील आंदोलनाचा टप्पाही तीव्र स्वरूपाचा असेल, असे जाहीर केले.
संजय जिरगे यांनी महिलांना कर्जमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी हा लढा तीव्र करूया, असे आवाहन केले. रूपा वायदंडे यांनीही महिलांचे शोषण करणाऱ्या या कंपन्यांची मनमानी येथून पुढे खपवून घेणार नसल्याचे सांगितले. मोर्चात रूपाली कांबळे, संभाजी पाटील, पुष्पा नलवडे, मुमताज नदाफ, सुरेखा पाटील, सतीश चांदणे, विलास टिपुगडे, बबलू अत्तार यांच्यासह बचतगटातील महिलांनी सहभाग घेतला.