कोनेवाडी (ता. चंदगड) येथे गुरुवारी (२०) मध्यरात्री सटुप्पा मुकुंद गावडे यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने अचानक लागलेल्या आगीत घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
सटुप्पा गावडे यांचे २०१९ मध्ये चंदगड तालुक्यात आलेल्या महापुरात घर पडून जमीनदोस्त झाले होते. तेव्हापासून ते घर बांधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना घर बांधणे शक्य झाले नाही. परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी त्याच जागेत पत्राचे खोपटे उभे करून राहत होते.
त्यातूनच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. तरीही ते न डगमगता आपला संसार सावरत आहेत. मात्र, गुरुवारी रात्री ते शॉर्टसर्किटने घराला आग लागली. आग लागल्याची माहिती गावामध्ये समजताच ग्रामस्थांनी घरातील घागरीने व विद्युत मोटारी सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सर्वकाही जळून खाक झाले होते.
आगीमध्ये काजूची ७ पोती, नाचना ६ पोती, भुईमूग ४ पोती, भात २१ पोती, सिमेंट पत्रे व लाकूड साहित्य ५४ नग, सोने व रोख रक्कम, शैक्षणिक व इतर कागदपत्रे असे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी तहसीलदार विनोद रणवरे यांनी भेट देऊन संबंधितांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. तलाठी वैभव कोंडेकर, ग्रामसेवक अंकुश गाडेकर, सरपंच ज्ञानदेव गावडे, पोलीस पाटील कृष्णा सुतार, वीजतंत्री राजाराम देवेकर यांनी पंचनामा केला.
यावेळी सदानंद गावडे, मोहन धुमाळे व पांडुरंग गावडे उपस्थित होते. पंचनाम्यात शॉर्टसर्किटने आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
-----------------
महापुरातील नुकसानीची भरपाई नाही, अग्नीचा प्रकोप..!
२०१९ मध्ये महापुरात गावडे यांचे घर जमीनदोस्त झाले होते. त्या घराची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. त्याच जागेवर कसेबसे उभे केलेले घरही आगीत जळून गेल्याने गावडे कुटुंबीय बेघर झाले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींना त्यांना सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे.
-----------------------
फोटो ओळी : कोनेवाडी (ता. चंदगड) येथील सटुप्पा गावडे यांच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, तलाठी वैभव कोंडेकर, ग्रामसेवक अंकुश गाडेकर, सरपंच ज्ञानदेव गावडे, पोलीस पाटील कृष्णा सुतार, वीजतंत्री राजाराम देवेकर उपस्थित होते.
क्रमांक : २१०५२०२१-गड-०७/०८