कोपार्डे : करवीर-पन्हाळा हद्दीवर असणाऱ्या वाघजाईचा डोंगराला रविवारी अज्ञातांनी आग लावली. या आगीत चिंचवडेपासून वरती डोंगरमाथ्यावर असणाऱ्या मंदिरापर्यंत व तिथून पुढे उत्तरेच्या बाजूला सातार्डे गावापर्यंत ही आग पुढे सरकत राहिल्याने वनसंपदा जळून खाक झाली. निसर्गप्रेमींनी पन्हाळा अग्निशमन विभागाशी संपर्क साधून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
वाघजाई डोंगर दरवर्षी अज्ञातांकडून लावण्यात येणाऱ्या आगीमुळे एप्रिल-मे महिन्यात काळाकुट्ट होत असतो. यासाठी वाघजाई डोंगर बचाव समिती नेमून भामटे-चिंचवडे-कळंबे गावच्या तरुणांनी आग लावू नये यासाठी प्रबोधन सुरू केले आहे. अलीकडेच या समितीने याबाबत पन्हाळा तहसीलदारांना वनविभागाला पाळत ठेवण्यासाठी सूचना देण्याचे निवेदन दिले होते. काही समाजकंटकांकडून डोंगरांना आग लावण्यात येत आहे.
आज, सकाळी अकरा वाजता चिंचवडच्या (ता. करवीर)च्या दरीत अज्ञातांनी आग लावली. ही आग संपूर्ण डोंगरावर पसरत डोंगरमाथ्यावर असणाऱ्या वाघजाईच्या मंदिरापर्यंत पोहोचली कळंबे भामटे गावच्या तरुणांनी पन्हाळा अग्निशमन दलाच्या संपर्क साधून अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण उत्तरेला पन्हाळ्याच्या बाजूला असणाऱ्या सातार्डे गावाकडे पसरणारी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी जाण्याचा रस्ता नसल्याने ही आग विझवता आली नाही आणि डोंगरावरील वनसंपदा जळून खाक झाली.
फोटो
१. करवीर पन्हाळ्याच्या सीमेवर असणाऱ्या वाघजाई सकाळी अकराच्या दरम्यान अज्ञातांकडून आग लावल्याने लेणी संपूर्ण डोंगराला आगीने घेरले
२. पन्हाळा अग्निशामन दलाच्या जवानांनी ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.