कोल्हापूर : गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार करून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकास ठार मारण्याची धमकी दिल्याने मानसिंग विजय बोंद्रे (वय ३३, रा. अंबाई टँक, रंकाळा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. मंगळवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास हॉटेल वृषालीसमोर हा प्रकार घडला.अधिक माहिती अशी, अनंत प्रेमनाथ शेट्टी (वय ४३, रा. दिव्यश्री अपार्टमेंट, बिजय कापीकाड-मंगलोर) हे कर्नाटकातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची बंगलोर येथे ई-गव्हर्नन्सद्वारे शासकीय कार्यालयांना संगणक व साहित्य पुरविणारी मोठी कंपनी आहे.
ते बहीण आरती रई व शरीररक्षक असे तिघेजण सोमवारी (दि. ११) नाशिक-औरंगाबादहून शनिशिंगणापूरला गेले होते. त्यांच्या हस्ते अंबाबाई मंदिरात अभिषेक असल्याने ते मंगळवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास कोल्हापुरात वृषाली हॉटेलवर आले.
प्रवेशद्वारातील दरवाजा बंद असल्याने त्यांची इनोव्हा गाडी (केए १९ एमसी ४४२७) बाहेर रस्त्यावर उभी होती. यावेळी कावळा नाक्याहून विरुद्ध दिशेने ताराबाई पार्ककडे भरधाव फॉर्च्युनर (एमएच ०९ ईके-०१११) मधून मानसिंग बोंद्रे या ठिकाणी आला. त्याने समोर उभ्या असलेल्या इनोव्हाच्या चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले.
‘गेट उघडले की गाडी आत घेतो’ असे म्हणताच बोंद्रेने रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. अनंत शेट्टी हे हॉटेलमध्ये गेले होते. ते बाहेर आपल्या गाडीजवळ आले. बोंद्रे याने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखत ‘गाडी बाजूला घे, नाहीतर अंगाची चाळण करीन,’ अशी धमकी दिली. शेट्टी यांना काहीवेळ सुचले नाही. हा प्रकार पाहून त्यांची बहीण भीतीने रडू लागली.
बोंद्रे हा मद्यधुंंद अवस्थेत होता. त्याचा तापट स्वभाव पाहून शेट्टी जागेवर थांबून राहिले. बोंद्रेचा अॅक्सिलेटरवर अचानक पाय पडल्याने त्याची गाडी पुढे गेली. इतक्यात हातातील रिव्हॉल्व्हरमधून गोळीही सुटली. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील सुरक्षारक्षक बाहेर आले. त्यानंतर बोंद्रे तेथून सुसाट धैर्यप्रसाद चौकाच्या दिशेने निघून गेला.सीसीटीव्हीवरून आरोपीची ओळखशेट्टी हॉटेलमध्ये येऊन बसले. येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना सावरले. त्यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व सहकारी घटनास्थळी आले. शेट्टी यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. हॉटेलच्या बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या गाडीत चालकाच्या जागेवर मानसिंग बोंद्रे हातामध्ये रिव्हॉल्व्हर घेऊन असल्याचे दिसले. त्याच्या शेजारी एक तरुण असल्याचे दिसले.
शेट्टी यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्याने पोलिसांनी बोंद्रेला तत्काळ अटक करून त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. तपासामध्ये आत्मसंरक्षणार्थ रिव्हॉल्व्हर परवाना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न कलम (३०७) नुसार गुन्हा दाखल केला. बोंद्रे याला अटक झाल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
पळून जाण्याचा प्रयत्नगोळीबारानंतर मानसिंग बोंद्रे हा आपल्या अंबाई टँक येथील घरी गेला. त्याने कपड्यांच्या चार बॅगा भरून गाडीत टाकल्या. अंघोळ करण्यास बाथरूममध्ये जाणार इतक्यात पोलीस दारात पोहोचले. त्याने मी आवरून स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहतो, असे सांगितले; परंतु पोलिसांनी आहे त्या अवस्थेत तुम्हाला घेऊन जाऊ असे सांगताच कपडे घालून तो पोलीस व्हॅनमध्ये बसला. पोलिसांना त्याच्या घरी जाण्यास थोडा जरी वेळ झाला असता तो पसार झाला असता, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.शेट्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभारीअनंत शेट्टी हे कर्नाटकातील कारवार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभारी आहेत. घटनेनंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ कारवाई झाली. शेट्टी हे मंगळवारी हॉटेलवर थांबून होते. त्यांच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र पोलीस तैनात केले होते.