स्वातीने जिंकला पहिला महापौर चषक : मुरगूडची नंदिनी साळोखे चितपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:03 AM2017-12-08T01:03:28+5:302017-12-08T01:05:45+5:30
कोल्हापूर : तब्बल दशकानंतर सुरू झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथमच घेण्यात आलेल्या महिला कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात मुरगूडच्या स्वाती शिंदेने नंदिनी साळोखे हिच्यावर एकेरी पट
कोल्हापूर : तब्बल दशकानंतर सुरू झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथमच घेण्यात आलेल्या महिला कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात मुरगूडच्या स्वाती शिंदेने नंदिनी साळोखे हिच्यावर एकेरी पट काढून एकेरी कसावर चितपट करीत विजेतेपद पटकाविले; तर ६० किलो गटात मुरगूडच्या सृष्टी भोसले, ५५ किलोगटात दिशा कारंडे (शिंगणापूर जि.प. शाळा) हिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत अजिंक्यपद पटकाविले.
राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात गुरुवारी महिला कुस्तीतील लढती झाल्या. यात खुल्या गटात उपात्य फेरीत उपभारत केसरी नंदिनी साळोखे हिने मुरगूडच्याच वैष्णवी कुशाप्पावर मात करीत अंतिम फेरी गाठली; तर दुसºया उपांत्य फेरीत स्वाती शिंदे (मुरगूड) हिने शिरोळच्या विनया पुजारीवर गुणांच्या जोरावर मात करीत अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीत मुरगूडच्याच साई केंद्राच्या व प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन महिला मल्ल सराव करीत आहेत. त्यांच्यातच अंतिम लढत झाल्याने कुस्तीशौकिनांना कोण जिंकणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेरीस रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते लागलेल्या या कुस्तीत ‘महिला उपभारत केसरी’ राहिलेल्या नंदिनीस पहिल्या फेरीत स्वातीने मजबूत पकड करीत खाली खेचले. त्यानंतर मिळालेल्या संधीवर स्वातीने एकेरी पट काढून एकेरी कसावर तिला चितपट केले. यात १० गुणांसह पहिला महापौर चषक पटकाविण्याची किमयाही स्वातीने साधली. यात मुरगूडच्याच वैष्णवी कुशाप्पाने प्रतिस्पर्ध्यावर मात करीत तिसरा क्रमांक पटकाविला. यातील विजेतीस पन्नास हजार, तर उपविजेतीस २५ हजार व चषक बहाल करण्यात आला.
महिलांच्या ६० किलो गटात सृष्टी भोसले (मुरगूड साई केंद्र) हिने येळवीच्या स्मिता माळीवर मात करीत तिसºया फेरीत प्रवेश केला; तर दुसºया बाजूने विश्रांती पाटील (शिंगणापूर, जिल्हा परिषद शाळा)ने शिरोळच्या प्रतीक्षा देबाजेवर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सृष्टी भोसले व विश्रांती पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. पहिल्या फेरीपासून सृष्टीने एकेरी पट काढून विश्रांतीला चितपट करण्याचा प्रयत्न केला. यातून सृष्टीचे ५, तर विश्रांतीचे दोन गुण झाले. हीच गुणसंख्या व वरचढ ठरत सृष्टीने विजेतेपद पटकाविले. मुरगूडच्या प्रतीक्षा देबाजेने तिसरा क्रमांक पटकाविला.
अंकिता शिंदे व अंजली पाटील (दोघीही मुरगूड, साई केंद्र) यांच्यात ५५ किलोगटात उपांत्य फेरीची लढत झाली. यात अंकिता शिंदेने गुणांवर मात अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसºया उपांत्य कुस्ती लढतीत शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दिशा कारंडेने शिंगणापूरच्याच स्मिता पाटीलला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत दिशा कारंडेने अंकिता शिंदेवर एकेरी कस काढत चितपट केले. यात दिशाने ६-४ अशा गुणफरकाने अंकितावर मात करीत विजेतेपद पटकाविले. या गटात अंजली पाटील (मुरगूड) हिने तिसरा क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन प्रतिमा पाटील, स्वाती कोरी, बक्षीस समारंभ संयोगिताराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी महापौर हसिना फरास, माजी खासदार निवेदिता माने, वेदांतिका माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांच्यासह महापालिका नगरसेविका व अन्य उपस्थित होते.
महापौर चषक महिला कुस्ती स्पर्धेतील विजेत्या स्वाती शिंदेस संयोगिताराजे यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, संगीता खाडे, महापौर हसिना फरास, आदी मान्यवर उपस्थित होत्या.