कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचा प्रारंभ आज, सोमवारपासून होणार आहे. विविध विद्याशाखानिहाय पहिला पेपर होईल. महाविद्यालयांनी दि. १५ मेपर्यंत परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात आली आहे.
विद्यापीठाने गेल्या दोन आठवड्यापूर्वी या अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित एकूण २७६ महाविद्यालयांना पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबतच्या सूचना केल्या. त्यानुसार अधिविभाग, महाविद्यालयांनी संगणक प्रणालीपासून सर्व तयारी केली आहे. जादा विद्याशाखांचे अभ्यासक्रम असलेल्या बहुतांश महाविद्यालयांतील परीक्षा सोमवारपासून, तर अन्य महाविद्यालयांमधील परीक्षा बुधवार (दि. ५) पासून सुरू होणार आहेत.
दरम्यान, महाविद्यालयांनी त्यांच्या पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. जे विद्यार्थी परीक्षा देणार नाहीत, त्यांना महाविद्यालयांनी दिलेला निकाल स्वीकारावा लागणार आहे. बहुतांश महाविद्यालयांतील परीक्षा सोमवारपासून सुरू होतील, असे शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे सचिव डॉ. व्ही. एम. पाटील यांनी रविवारी सांगितले.
चौकट
५० गुणांसाठी २५ प्रश्न
रोज दिवसभरात चार ते पाच सत्रांमध्ये ऑनलाईन परीक्षा होईल. त्यासाठी ५० गुणांचा २५ एमसीक्यू स्वरूपातील प्रश्नांचा पेपर असणार आहे. हा पेपर सोडविण्यासाठी एक तासाचा वेळ असणार आहे. पेपर देताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास ती दूर झाल्यानंतर तितका वेळ विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वाढवून दिला जाणार आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात...
संलग्नित महाविद्यालये : २७६
प्रथम वर्ष विद्यार्थी संख्या : ६२८००