कोल्हापूर : मध्यरात्रीपासूनच घराघरात जेवणाची लगबग, दिवसभर नमाज पठण, नामस्मरण आणि संध्याकाळी घरात सहकुटुंब इफ्तार अशा वातावरणात रमजानच्या पवित्र पर्वाला पहिल्या रोजाने सुरुवात झाली. कोरोनामुळे मशिदीबाहेरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील गर्दीवर मर्यादा आल्याने रोजा सोडण्यासाठी घराघरात माहे रमजानच्या शुभेच्छा देत मैफली जमल्याचे चित्र होते.
रमजान महिन्यातील तीस दिवसांच्या रोजांसाठी पूर्वतयारी मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु होती. घराघरात स्वच्छतेसह संभाव्य लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सहरी व इफ्तारसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. फळांची मागणी या काळात जास्त असल्याने कलिंगड, द्राक्ष, डाळिंबासह अन्य फळांची मागणीही वाढली आहे. पावसामुळे ही फळेही बाजारात मुबलक प्रमाणात आली आहेत, पण त्यांची प्रत खालावल्याने खरेदीवर मर्यादा आल्याचे दिसत आहे. बेकरी व दुग्धजन्य पदार्थांची मागणी जास्त असल्याने बऱ्यापैकी दुकानांमध्ये हे पदार्थ उपलब्ध आहेत.
उन्हाचा कडाका जास्त आणि दिवसही मोठा असल्याच्या या काळात दिवसभर पाण्याचा थेंबही न घेता कडक उपवास करणे ही शरिराची व मनाची परीक्षा पाहणाराच आहे. पण श्रध्देपोटी रोजे केले जातात. पण हे करताना पहाटे दिवसभर गारवा देणारा सालस आहार घेण्यासह संध्याकाळी रोजा सोडताना पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांसह जायदी खजुराचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरणार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील आहारतज्ज्ञांचे मत आहे.
फोटो: १४०४२०२१-कोल-रमजान ०१
फोटो ओळ : रमजान महिन्याच्या पवित्र पर्वाची सुरुवात बुधवारी झाली. कोरोनाच्या निर्बंधामुळे घरातच पहिल्या रोजाच्या निमित्ताने छोटेखानी इफ्तार पार्ट्या रंगल्याचे चित्र कोल्हापुरात दिसत होते. (छाया: नसीर अत्तार )
फोटो: १४०४२०२१-कोल-रमजान ०२
फोटो ओळ : रमजान महिन्याच्या पवित्र पर्वाची सुरुवात बुधवारी झाली. इफ्तारची तयारी म्हणून खजूर घेण्यासाठी बाजारात मुस्लिम बांधवाची गर्दी होत आहे. (छाया : नसीर अत्तार)