पहिल्या फेरीत ‘केआयटी’ महाविद्यालयाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:02 AM2019-07-13T11:02:12+5:302019-07-13T11:03:24+5:30
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश्चितीची प्रक्रिया सुरू झाली.
कोल्हापूर : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश्चितीची प्रक्रिया सुरू झाली.
राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या प्रवेश फेरीची अधिकृत यादी बुधवारी (दि. १०) सायंकाळी जाहीर झाली. त्यामध्ये विनाअनुदानित व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘केआयटी’ला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. ‘केआयटी’च्या ६७४ पैकी ६१० जागांवर विद्यार्थी पसंती मिळाल्याने या महाविद्यालयाची अलॉटमेंट जवळपास ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
याबाबत ‘केआयटी’चे अध्यक्ष भरत पाटील म्हणाले, अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश प्रक्रियेत कमी नोंदणीचे चित्र असल्याचे दिसत असताना ‘केआयटी’चा हा आकडा समाधानपूर्वक वाढला आहे. नव्याने सुरू झालेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व फक्त ‘केआयटी’मध्ये असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग व एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग या विद्याशाखांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
पहिला प्रवेश घेतलेल्या अनुप अरुण शिर्के (रा. लोणंद, जि. सातारा) या विद्यार्थ्यांचे उपाध्यक्ष कुलकर्णी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी दीपक चौगुले, विश्वस्त डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, अधिष्ठाता डॉ. एम. एस. चव्हाण, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. दि. जे. साठे, प्रवेश प्रक्रिया आयोजक समीर नागटिळक, प्रा. विजय रोकडे, आदी उपस्थित होते.
मुदत उद्यापर्यंत
प्रवेश निश्चितीसाठी महाविद्यालयात दिवसभर पालक, विद्यार्थ्यांची गर्दी होती. पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित करण्याची मुदत उद्या, रविवारपर्यंत आहे, अशी माहिती उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी दिली.