महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा पहिला बळी, कणेरकर नगरातील बाधित वृद्ध सराफाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 03:57 PM2020-06-25T15:57:51+5:302020-06-25T16:21:47+5:30
कोल्हापूर येथील कणेरकर नगरातील कोरोना बाधित सराफाचा आज मृत्यु झाला. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा नववा तर महापालिका क्षेत्रातील पहिला बळी आहे. कोल्हापूर शहरातील कणेरकरनगर भागात आणखीन चार नवे रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर : येथील कणेरकर नगरातील कोरोना बाधित वृद्ध सराफाचा (वय ६२) आज सकाळी ७ वाजता मृत्यु झाला. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा नववा तर महापालिका क्षेत्रातील पहिला बळी आहे. कोल्हापूर शहरातील कणेरकरनगर भागात आणखीन चार नवे रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढतच आहे. काल दिवसभरात एकूण १५ कोरोना बाधित आढळले, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७६५ वर पोहोचली.
एकूण ७१० व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत तर कालपर्यंत ४७ बाधित रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. येथे उपचार घेत असलेल्या न्यू कणेरकरनगरमधील या सराफाची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला, यामुळे शहरातील जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या आता नऊ वर पोहोचली आहे.
दरम्यान, कणेरकरनगर भागातील नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये पुन्हा चार नवीन रुग्ण आढळल्यामुळे या भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वृद्ध सराफाचा मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शववाहिकेतून पंचगंगा स्मशानभूमीत नेण्यात आला. महानगर पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.