करवीर क्षेत्रात अंबाबाईच्या समकालीन पाच मूर्ती --तीनच मूर्ती मंदिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:18 AM2017-09-26T01:18:07+5:302017-09-26T01:19:33+5:30
आदित्य वेल्हाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘करवीरकाशी’ मानल्या जाणाºया प्राचीन करवीरनगरीच्या परिसरात श्री अंबाबाई मूर्तीइतक्याच प्राचीन आणखी पाच समकालीन मूर्ती आजही अस्तित्वात असून, जीर्ण आणि दुर्लक्षित असलेल्या या मूर्तींकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाºया या मूर्तींपैकी केवळ तीनच मूर्तींची मंदिरे अस्तित्वात आहेत.
कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ. स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीच्या शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून हे अंबाबाईचे मंदिर किती प्राचीन आहे, हे सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खºया अर्थाने महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.
असा आहे
अंबाबाई मूर्तीचा इतिहास आणि चिन्ह
मोगलांनी काही मंदिरांचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाºयांनी अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे मानले जाते. पुढे छत्रपती संभाजी महाराज (द्वितीय) यांच्या आदेशानुसार इ.स. २६ सप्टेंबर १७१५ या विजयादशमीच्या मुहूर्तावर सिदोजीराव हिंदुराव घोरपडे या सरदारांनी या मूर्तीची पुनर्स्थापना केली. अंबाबाईच्या मूर्तीजवळ सिंह आणि शिरावर शिवलिंग आहे.
देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे. देवी चतुर्भूजा असून, डाव्या हातात म्हाळुंग फळ, खेटक (ढाल); उजव्या हातात गदा आणि पानपात्र अशी महत्त्वाची चिन्हे आहेत. मस्तकावर नाग, लिंगयोनी ही प्रतीके आहेत. ही चिन्हे ही या देवीची महत्त्वाची ओळख आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे.
‘करवीरमाहात्म्य’ ग्रंथात या देवीचे वर्णन आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे. या मूूर्तीवर ३०० वर्षांच्या कालावधीत १९५५ आणि २०१६ अशी दोन वेळा वज्रलेप प्रक्रिया केली आहे.
अंबाबाई मंदिराच्या आवारात सन १९६४ मध्ये मणिकर्णिका तीर्थकुंड मुजवताना सापडलेली अंबाबाईची मूर्ती पूर्वी टाऊन हॉल येथील वस्तुसंग्रहालयात ठेवली होती. सध्या ती कसबा बावडा येथील लक्ष्मी-विलास पॅलेस परिसरात उघड्यावर आहे. या मूर्तीचे दोन्ही हात खंडित असून चेहरा झिजलेला आहे.
कसबा बीड : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीसारखीच करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील ग्रामदैवत महादेव मंदिर परिसरात ही मूर्ती आहे. ती सुमारे ८०० ते ९०० वर्षे इतकी प्राचीन असावी, असा मूर्तितज्ज्ञांचा अंदाज आहे. या मूर्तीचीही झीज झाली. कसबा बीड ही राजा दुसरा भोज याची राजधानी होती.
पाचगाव : पाचगाव ग्रामदेवतेच्या मंदिराच्या पिछाडीस ही अंबाबाईची मूर्ती भिंतीला टेकवून ठेवली आहे. दुर्दैवाने कोणी तरी या मूर्तीला केशरी आॅईल पेंटने रंगविले आहे. पांडव पत्नी पांचाली हिने या स्थानावरच अक्षयपात्रातून पांडवांना भोजन वाढल्याची आख्यायिका आहे. त्याचा उल्लेख करवीर महात्म या ग्रंथात आहे.
चक्रेश्वरवाडी : चक्रेश्वरवाडी (ता.राधानगरी) येथील अंबाबाईची प्रतिकृती असलेली ही मूर्ती आहे. शाक्त उपासनेच्या करवीर क्षेत्राच्या करवीरनिवासिनी अंबाबाईसह महाकाली, महासरस्वती, रंकभैरव, कार्तिक स्वामी, महिषासूरमर्दिनी, मातृकापट्ट भैरवी अशा देवतांच्या मूर्तीही येथील परिसरात आहेत.
कोल्हापूर : इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात १८ इंचांची पाषाणमूर्ती सन १९५५ च्या वज्रलेप प्रक्रियेदरम्यान पूजेसाठी ही मूर्ती छत्रपती घराण्याने बनवून घेतली होती; परंतु प्रतिमूर्तीऐवजी श्रीयंत्राचा पर्याय स्वीकारल्यामुळे ही कोरीव आणि सुंदर मूर्ती हायस्कूलच्या चौकात काही काळ ठेवली होती.
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीसारख्याच या मूर्तीही प्राचीन असून करवीर क्षेत्रांत वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या आहेत. या मूर्तीचे पावित्र्य राखून त्यांचे योग्यरितीने जतन करून त्यांची नित्य पूजा व्हावी.
- उमाकांत राणिंगा, मूर्ती आणि शिल्प अभ्यासक, कोल्हापूर