पाचगावचा पाणीप्रश्न अद्यापही कोरडाच

By admin | Published: December 9, 2015 09:30 PM2015-12-09T21:30:46+5:302015-12-10T01:01:54+5:30

उपाययोजना नाहीत : संघर्ष थांबणार की राजकारण करून पाचगावकरांना पाण्याची ढाल बनविणार

The five-phase water question is still dry | पाचगावचा पाणीप्रश्न अद्यापही कोरडाच

पाचगावचा पाणीप्रश्न अद्यापही कोरडाच

Next

ज्योती पाटील-- पाचगाव -कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाण्यासाठी कळीचा मुद्दा ठरलेले पाचगाव आजही पाण्यासाठी चर्चेत आले. गेल्या अनेक वर्षांपासून पाचगावमध्ये पिण्याचे पाणी आणि त्यातून निर्माण झालेला संघर्ष काहींच्या जिवावर बेतला आहे. आतातरी हे थांबणार की पाण्यासाठी राजकारण करून पाचगावकरांना पाण्याची ढाल बनविणार, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.पाचगावचे वाढते विस्तारीकरण व वाढती लोकसंख्या पाहता प्रशासनाने कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. लोकप्रतिनिधी व महापालिका यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाचगाव उपनगरातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कळंबा तलावातून भारत निर्माण योजनेतून २००९/१० मध्ये नळ पाणीपुरवठा योजना करून या योजनेतून शांतीनगर ते पोवार कॉलनी व शिक्षक कॉलनीपर्यंतच्या सर्व भागास पिण्याचे पाणी पुरविले जाते. ही पाणीपुरवठा योजना महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली असून महापालिकेकडून पुरते दुर्लक्ष होताना दिसत आहे.१० मे २०१५ ला पाचगावमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगाव नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ झाला. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर सतेज पाटील यांनी सांगितले, ही पाणी योजना आमच्या सरकारच्या काळात मंजूर झाली असून, त्याचा पाठपुरावा आम्ही केला आणि आता विरोधक त्याचे श्रेय घेत आहेत. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. पाचगावमध्ये पाणी कोण आणणार आणि त्याचे श्रेय कोण घेणार? या दोन्ही गटांच्या वादामध्येच पाचगावकर पाण्याविना तडफडत आहेत. पाचगावमध्ये लोकांनी बंगले, घरे बांधूनदेखील पाण्याची दैनंदिन अवस्था पाहून अनेकांनी पाचगाव सोडून अन्य ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कळंबा तलावातील पाण्याची पातळी ओसरल्यामुळे पाणीसाठा संपत आला आहे. त्यामुळे उपनगरातील लोकांना पाण्याची चणचण भासू लागली आहे. पाचगावमध्ये ‘तळे उशाला अन् कोरड घशाला’ अशीच अवस्था झाली आहे. पाण्यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीवर दगडफेक, मारामाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत.
पाण्याचा संभाव्य धोका ओळखून पाचगाव ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव करून १५ आॅगस्ट २०१५ ला झालेल्या ग्रामसभेत २०१५-१६ मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करून व टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविणे व टंचाई प्रतिबंधात्मक आराखडा तयार करून महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३ अंतर्गत कलम ४ अन्वये पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यासाठी पाण्याची तात्पुरती उपाययोजना म्हणून भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या. गिरगाव आश्रमशाळा येथून फिल्टर हाऊस पाचगाव येथे पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच शाहू सहकारी पाणीपुरवठा योजना आश्रमशाळा येथून फिल्टर हाऊस पाचगाव येथे पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केल्याचे समजते. त्यासाठी अंदाजे नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रकही जोडले आहे.


निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधी येतात, पाण्याची घोषणा करतात. निवडणूक झाली की सांगतात, महापालिकेला विचारा. महापालिकेला विचारले की, कोणीही दाद देत नाही. १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तेही दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याच्या लायकीचे नसलेले. मग सर्वसामान्यांना आधार घ्यावा लागतो, तो खासगी टँकरवाल्यांचा. कारण पालिकेच्या टँकरला फोन केला की, उडवाउडवीची उत्तरे मिळतात. ज्याचा वशिला मोठा त्याच्या दारात लगेच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. - सौ. स्नेहल संजय सावंत, समृद्धीनगर, पाचगाव.


पाचगाव उपनगरातील लोकांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून शासनदरबारी प्रश्न मांडला आहे. आणि त्याचा पाठपुरावा करत गिरगाव आश्रमशाळेजवळून पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगाव नळ पाणीपुरवठ्याचे काम चालू आहे.
-भिकाजी गाडगीळ, ग्रामपंचायत सदस्य, पाचगाव.

पाचगाव संघर्ष आणि भंग पावलेली शांतता जर खरोखर सुधारायची असेल तर पाणीप्रश्न निकालात निघायला हवा, अशी जनतेतून कळकळीची मागणी होत आहे.

Web Title: The five-phase water question is still dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.