इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाच्या उभारणीसाठी सवलती, तसेच पूरग्रस्त शेतकरी, नागरिक व व्यापारीवर्गाला तातडीची मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयाने प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, देशामध्ये ५० टक्के यंत्रमाग उद्योग हा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने विविध सवलतींचा निर्णय घेतला आहे; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. दीड वर्षाचा कालावधी लोटला तरीही २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांसाठी वीज दरातील प्रतियुनिट अतिरिक्त ७५ पैशांची सवलत अजूनही मिळालेली नाही, तर २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागांसाठी वीज दरामध्ये प्रतियुनिट १ रुपयाची सवलत द्यावी.
तसेच जिल्ह्यासह शहरातील नदीकाठच्या नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. त्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये द्यावेत. प्रतिकुटुंब २५ किलो गहू व २५ किलो तांदूळ मोफत द्यावे. नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांचे पंचनामे करावेत. पुरामुळे झालेल्या छोट्या उद्योगांच्या नुकसानीपोटी त्या उद्योगांचा पंचनामा जिल्हा उद्योग केंद्राकडून करून त्यांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये द्यावेत. पंतप्रधान आवास योजनेचे दोन लाख ७३ हजार व राज्य शासनाचे दोन लाख ७३ हजार रुपये असे एकत्रित अनुदान देऊन त्यांना घरे बांधण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे, अनिकेत चव्हाण, आदींचा समावेश होता.