पन्हाळ्याचा कारभार चालतो भाड्याच्या जागेत
By admin | Published: March 30, 2015 11:24 PM2015-03-30T23:24:51+5:302015-03-31T00:27:56+5:30
या इमारतीच्या शेजारी वनविभाग परिक्षेत्र हे कार्यालयदेखील ऐतिहासिक इमारतीमध्ये आहे. या कार्यालयाच्या मोजक्याच दोन-तीन खोल्या
किरण मस्कर - कोतोली--पन्हाळगडावर चालणारा प्रशासनाचा कारभार हा शासकीय कार्यालयांना पुरेशी जागा नसल्यामुळे व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा-सुविधा वेळेत मिळत नसल्याने भाड्याच्या जागेत चालत आहे.गडावर असणाऱ्या ऐतिहासिक इमारतीच्या जागेत तहसील कार्यालय आहे, पण कार्यालयांतर्गत येणाऱ्या अन्य विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अथवा नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी अशी जागा नाही. या इमारतीमध्ये पोलीस गार्डरूम व पोलीस ठाण्याचा तुरुंग विभाग, त्यात पोलिसांचे शस्त्रागार विभाग व उपकोषागार कार्यालय एकाच इमारतीमध्ये आहे, पण शासनाचा खजिना, पोलीस ठाण्यातील आरोपी व शस्त्रे ही याच इमारतीमध्ये दिसतात. या कार्यालयात स्वमालकीचे स्वच्छतागृहही नाही. नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाचा वापर येथील कर्मचारी व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे. या इमारतीच्या शेजारी वनविभाग परिक्षेत्र हे कार्यालयदेखील ऐतिहासिक इमारतीमध्ये आहे. या कार्यालयाच्या मोजक्याच दोन-तीन खोल्या असून कर्मचारी अथवा इतर नागरिकांना बसण्यास पुरेशी जागा नाही, तर नगरपालिकेच्या सभागृहात प्रांत कार्यालय, भूमिअभिलेख, तसेच तालुका कृषी कार्यालयही एका खासगी इमारतीच्या तळघरात भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. या सर्वांमध्ये पन्हाळा पंचायत समितीची इमारत मात्र स्व:मालकीची असून, सर्व सोयीसुविधा याठिकाणी आहेत.
पन्हाळ्यात प्रांत कार्यालय, तहसील कचेरी, वन विभाग परिक्षेत्र, पोलीस ठाणे, बिनतारी संदेश विभागीय कार्यालय, उपकोषागार कार्यालय, न्यायालय, कृषी विभाग, सहा. निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, तालुका पुरवठा अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, पोस्ट आॅफिस, भूमी अधीक्षक, पुरातत्त्व अधीक्षक, पंचायत समिती कार्यालय, अशी कार्यालये आहेत, तर यातील काही कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत तसेच काही कार्यालये पन्हाळा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून या सर्वांची एकच मध्यवर्ती इमारत होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे, पण या प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयासाठी अद्याप तरी मुहूर्त सापडलेला नाही.