सुहास जाधव ।पेठवडगाव : पोलीस प्रशासनाच्या खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यातील ८२८ पोलीस कर्मचारी ट्रेनिंगसाठी पात्र झाले आहेत. मात्र, पाच महिने शासनाने कोणतीही सूचना अद्यापही दिलेली नाही. त्यामुळे ‘संदेशा कब आता है’ याकडे भावी फौजदारांचे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २१ जून २०१६ ला पोलीस कर्मचाºयांची खात्यांतर्गत ८२८ जागांसाठी भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली. या नियोजनानुसार २१ आॅगस्ट २०१६ ला लेखी परीक्षा घेण्यात आली. यामधील पात्र उमेदवारांची निवड निश्चित झाल्यानंतर २१ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या काळात शारीरिक चाचणी घेण्यात आली.
या परीक्षेचा निकाल ५ मे ला प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पात्र ८२८ फौजदारांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी १० आॅगस्टला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश संबंधित प्रशिक्षणार्थी फौजदारांना लागू केले होते. त्यानुसार वैद्यकीय तपासणी व कागदपत्रे नाशिकला पाठविण्यात आली होती.त्यानुसार पोलीस प्रशासनाने प्रक्रिया करून अहवाल नाशिकला पाठवला. तसेच संबंधित पोलीस कर्मचाºयांना फेरबदलामुळे कार्यमुक्तचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर वर्षभर नाशिक येथे फौजदारांचे ट्रेनिंग चालणार असे गृहीत धरून पाल्यांचे शैक्षणिक नियोजन केले होते. पोलीस म्हणून काम करताना अडचणी येतात. येथे जबाबदारीच्या कामाऐवजी इतर ठिकाणी बंदोबस्त करण्यास जावे लागते. त्यामुळे धड पोलिसाची नोकरी ना घरच्यांना, अशा दुहेरी कात्रीत फौजदार सापडले आहेत.वरिष्ठांचा तत्काळ प्रशिक्षणाचा आदेश न आल्यास त्यांची अवस्था ‘तेलही गेले तूपही गेले’ अशी होणार आहे.महिना होत आला तरी अंमलबजावणी नाहीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात ३५/२०१६ नुसार निवड केली होती. मात्र, काही अपात्र उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालय व मॅटमध्ये हरकत घेतली होती. याप्रश्नी स्टेटस क्यू घेतला होता. मात्र, त्यानंतर स्टेटस क्यू उठविला. पोलीस महासंचालकांनी १३ नोव्हेंबरला नाशिक येथे ट्रेनिंगला उपस्थित राहावे, असे आदेश काढले आहेत. मात्र, महिना होत आला तरी अंमलबजावणी झालेली नाही.जिल्ह्यातील दहाजण पोलीस उपनिरीक्षकासाठी पात्र झालेले आहेत. राजू डांगे, राजू अन्नछत्रे, राहुल साबळे, राहुल जोंग, महेश पाटील, मुसा देवर्षी, प्रवीण जाधव, सतपाल कांबळे, विकास शेळके, अभय शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांचा त्यामध्ये समावेश आहे.