कोल्हापूर : निवडणूक न घेता महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिसऱ्यावेळी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्याची वेळ निवडणूक प्रशासनावर आली. यामुळेच शुक्रवारच्या आरक्षण सोडतीवेळी उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आता आरक्षण नको, निवडणूक कधी होणार ते सांगा, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र याचे उत्तर महापालिका निवडणूक यंत्रणेकडे नसल्याने ते निरुत्तर झाले.महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली. त्यावेळी कोरोनाचा प्रसार व्यापक प्रमाणात होता. यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली नाही. महापालिकेेवर डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने २१ डिसेंबर २०२० मध्ये आरक्षणाची सोडत काढण्यात आली. मतदार यादीही तयार करण्यात आली. पण पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लागला. प्रशासक डॉ. बलकवडे यांना मुदतवाढ मिळाली. अजूनही प्रशासकराजच आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना एकऐवजी तीन सदस्यीय प्रभागरचना जाहीर केली. यानुसार नव्याने शहरात ८१ ऐवजी ३१ प्रभागात ९१ नगरसेवक झाले. दरम्यानच्या काळात न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केले. यामुळे ओबीसीशिवायचे आरक्षण ३१ मे २०२२ रोजी काढण्यात आले. अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करून मतदार यादीचे कामही केले जात आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुक तयारीलाही लागले होते. नुकतेच पुन्हा ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. यामुळे ३१ मे रोजीचे आरक्षण रद्द करून पुन्हा ओबीसीसह शुक्रवारी आरक्षण काढण्यात आले.निवडणूक न होता आतापर्यंत तीनवेळा आरक्षण निघाल्याने इच्छुकांमधील आरक्षण प्रक्रियेतील उत्सुकताच नाहीशी झाली आहे. आता नव्याने पडलेले तरी आरक्षण अंतिम आहे का, असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यामुळे जोपर्यंत निवडणुकीची प्रत्यक्षातील प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत आरक्षणाचेही काही खरं नाही, अशी भावना काही इच्छुकांमध्ये आहे.
दोनवेळा इच्छुकांच्या तयारीवर पाणी
यापूर्वी दोनवेळा काढण्यात आलेल्या आरक्षणानंतर प्रभागनिहाय इच्छुकांनी जोरदार तयारी केली. मतदारांत संपर्क वाढवला. पण निवडणूक झाली नाही. तिसऱ्यांदा पुन्हा आरक्षण काढण्यात आले. यामुळे दोनवेळा आरक्षण पडल्यानंतर इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरले. यावेळीही तरी तसे आता होऊ नये, अशी अपेक्षा आरक्षण सोडतीवेळी उपस्थित असलेल्या इच्छुकांतील काहीजणांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.