निवेदनात म्हटले आहे की शुक्रवारी (दि. १२) मुसळवाडी (ता. राधानगरी) गावाशेजारी असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील जंगलाला रात्री आठ वाजता आग लागली होती. याच दरम्यान रस्त्यावरून जात असताना आग पाहिल्यानंतर वनरक्षक उमा जाधव यांना फोन करून आगीची माहिती दिली. त्यानंतर वनपाल तिवडे यांनी फोन करून आगीचे ठिकाण विचारल्यानंतर त्यांनाही ठिकाण सांगितले.
मात्र त्यानंतरही जवळपास तास दीड तास कोणीही आगीच्या ठिकाणी फिरकले नसल्याने आणि आगीने उग्र रूप धारण केल्याने मी अन्य मित्रांसह आग विझविण्यास सुरुवात केली. या दरम्यान पुन्हा जाधव यांच्याशी संपर्क साधून आगीची व्याप्ती वाढत असल्याचे सांगितले. तुमचे कोणीही कर्मचारी येथपर्यंत पोचलेले नाहीत, असे जेव्हा मी त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मलाच फोनवरून दरडाविण्यास सुरुवात केली. शासकीय कर्मचारी असूनही कर्तव्य आणि जबाबदारी विसरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सागर कांबळे यांनी निवेदनात केली आहे.