कोल्हापूर : रस्त्यांची बिघडलेली प्लींथ लेव्हल (जमीन स्तर), पाणी निचऱ्याचे अयोग्य नियोजन, अस्वच्छता व काटकोनात वळविलेली गटर्स, पावसाळी नियोजनाचा उडालेला फज्जा आदींमुळे शहराला रविवारच्या अवकाळी पावसात डबक्यांचे स्वरूप आले. काही ठिकाणी फुटापेक्षा अधिक असलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागली. राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आदी परिसरात ‘कासव छाप’ रस्त्यांच्या कामांमुळे त्यात भरच पडली.रस्ते विकास प्रकल्पापूर्वी हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या ठिकाणीच पाणी साचत असे. रस्ते प्रकल्प राबविताना जमिनीचा स्तर वर-खाली झाल्याने पाण्याचा निचरा परिणामकारक होत नाही. शहरात तब्बल २२ कोटी रुपयांचे रेन वॉटर मॅनेजमेंट(पावसाळी पाणी नियोजन)चे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. ठेकेदारांचा हलगर्जीपणा व महापालिकेचे दुर्लक्ष यामुळे संपूर्ण कामाचा बोजवारा उडाला आहे. राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, लक्ष्मीपुरी व शाहूपुरी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून ठेके दाराने पाईपलाईनसाठी खुदाई केली आहे. अनेक ठिकाणी चेंबर्सची कामे अपूर्ण आहेत. काही ठिकाणी पाईप टाकल्या आहेत, त्या उघड्यावरच आहेत तर काही ठिकाणी पाईपसाठी रस्त्यांची खुदाई केली आहे, परंतु पाईपचा पत्ता नाही. पाईपची साफसफाई न केल्याने पाणी रस्त्यावर साचून राहते. लक्ष्मीपुरी कोंडाओळला पाईप टाकून पूर्ण झाली तरी पाईपमधून पाणीच जात नाही. रस्त्यावरच पाणी साचून राहत असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कडेला पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी दोन फुटांपेक्षा मोठे चॅनेल बांधण्यात आले. मात्र, चॅनेलमधून पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी आवश्यक उतार ठेवण्यात आला नाही. चॅनेल अनेक ठिकाणी काटकोनात वळविण्यात आले आहेत. चॅनेल एकमेकांना न जोडता मध्येच बंद केली आहेत. चॅनेलची कधीही स्वच्छता केली जात नाही. कचऱ्यासह पाला-पाचोळा रस्त्यावरील पाणी चॅनेलमध्ये जाण्यासाठी ठेवलेल्या जागेत अडकल्याने रस्त्यावर पाण्याची डबकी साचली आहेत. (प्रतिनिधी)दलदलमुख्य बसस्थानक ते राजारामपुरी अशा दोन भागांना जोडणाऱ्या रेल्वेच्या परिख पुलाखाली पाणी साचते. मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर पावसाळी पाणी नियोजनाचे काम रखडले आहे. राजारामपुरी मुख्य रस्त्यासह उपरस्त्यांवर मोठी खुदाई केली आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने या परिसरास दलदलीचे स्वरूप आले आहे.साखर कारखान्यांची चिमणी थंडावलीकोल्हापूर : रविवारी पहाटेपर्यंत झालेल्या दमदार पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. उसाची तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून त्यामुळे कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे उसाची रिकव्हरी कमी पडणार असल्याने त्याचा फटकाही कारखान्यांना बसणार आहे. जिल्ह्णातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मार्चअखेर बहुतांशी कारखान्यांचा गळीत हंगाम संपणार आहे. सध्या उसाचे क्षेत्र हे अडचणीतील राहिलेले आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्णाच्या पश्चिमेकडील भागात पाणंदींची संख्या फारच कमी असल्याने ऊस वाहतूक करताना कसरतच करावी लागते. त्यात गेले दोन दिवस जिल्ह्णात ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे उसाच्या सरी पाण्याने भरलेल्या आहेत, ऊस तोडणी मजुरांना ऊस तोडणी बाजूलाच पण शिवारात उभे राहता येत नाही, इतका पाऊस झाला आहे. ऊस तोडणी व वाहतूक करणे अडचणीचे असल्याने कारखान्यांची ऊस वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शनिवारी (दि. २८) दुपारपर्यंत ऊस भरलेली वाहनेच साखर कारखान्यांवर येत आहेत. रविवारी पहाटेपासून जिल्ह्णात पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने सकाळी ऊस तोडणी बंद झाली आहे. रविवारचा पूर्ण दिवस तोडणी व वाहतूक बंद झाल्याने उसाअभावी कारखाने बंद करावे लागत आहेत. या पावसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. पाण्याअभावी वाळणाऱ्या उसाला पावसामुळे थोडा जीवदान मिळाले आहे पण त्याचा फटका कारखान्यांना बसणार आहे. थंडी, ढगाळ हवामान व पावसामुळे उसामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते, परिणामी उसाची रिकव्हरी कमी होते. रिकव्हरीचा फटका व एक दिवस कारखाना बंद करावा लागल्याने कारखान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. गुऱ्हाळघरांनाही फटका!जिल्ह्णातील गुऱ्हाळघरांचा हंगामही अंतिम टप्प्यात आहे. अचानक आलेल्या पावसाने गुऱ्हाळमालकांची चांगलीच तारांबळ उडाली. उसाच्या तोडण्या थांबल्या, जळण भिजले आहे. त्यातच खराब हवामानामुळे गुळाच्या रंगावर परिणाम झाल्याने गुऱ्हाळमालकांचे मोठे नुकसान झाले आहे. ‘राजाराम’च्या ऊसतोडण्या बंदकसबा बावडा : कसबा बावडा आणि परिसरात रविवारी पहाटे पाऊस झाला. पावसामुळे ‘राजाराम’ साखर कारखान्याच्या ऊस तोडण्या बंद पडल्या. ऊसतोड मजुरांचे खूप हाल झाले. राजाराम कारखान्याच्या ३०० बैलगाड्या, २५० ट्रॅक्टर आणि ६० ट्रक यांना आता तोडण्या बंद पडल्यामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. पावसाने उघडीप दिली, तर दोन दिवसांत तोडण्या पूर्ववत होतील, असे कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी दीपक गोरे यांनी सांगितले. ऊसतोड शेतमजुरांचे धान्य भिजू नये म्हणून त्यांचे धान्य कारखान्याच्या हॉलमध्ये ठेवले असल्याचे गोरे यांनी सांगितले.सूर्यावरील ‘सौर वारे’ २८ फेबु्रवारीला पृथ्वीवर धडकल्याने हवामानात हा बदल झाला आहे. प्रोटॉनच्या क्षमतेवर पावसाची तीव्रता अवलंबून असते. सध्याच्या सौर वाऱ्यात प्रोटॉनची घनता ३.६ क्यूबिक/ सेंटिमीटर इतकी असल्याने आणखी दोन दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे. - प्रा. डॉ. एस. बी. मोहिते (संशोधक)‘मी आहे अवकाळी, आता माझी सटकली’, ‘अरे... रे.. आंबे खायचे राहूनच गेले, डायरेक्ट पावसाळा आला’, अशा स्वरूपातील संदेशांनी रविवारी अनेकांनी अवकाळी पावसाचे विडबंनात्मक स्वागत केले. छायाचित्रे, कॅलिग्राफी, सूचक वाक्यांचा अचूक उपयोग करत अवकाळीबाबतचे संदेश दिवसभर व्हॉटस्-अॅप, फेसबुक, हाईक अशा सोशल मीडियावरून फिरत होते.बाजारपेठा थंड !पहाटेपासून पाऊस सुरू झाल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. कोल्हापूर बाजार समितीमधील फळ, भाजीपाला मार्केटमध्ये याची तीव्रता जाणवली. अनेक ठिकाणी आठवडा बाजारात ग्राहकांची तुरळक हजेरी दिसली.
कोल्हापूर शहराला आले डबक्यांचे स्वरुप
By admin | Published: March 02, 2015 12:01 AM