बेचाळीस टक्के हमाली वाढ अमान्य
By Admin | Published: September 22, 2015 10:55 PM2015-09-22T22:55:26+5:302015-09-22T23:50:12+5:30
'ट्रान्स्पोर्ट' घालणार जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
इचलकरंजी : मालगाडीत कापडाच्या गाठी भरणे आणि सुताची बाचकी उतरविण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सुचविलेला ४२ टक्के मजुरीवाढीचा प्रस्ताव ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने फेटाळल्यामुळे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील बैठक निर्णयाविना संपली. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालण्याचा निर्णय ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने घेतल्याचे आनंदराव नेमिष्टे यांनी सांगितले.हमालीवाढीचा करार संपल्यानंतर हमाल संघटनांच्या कृती समितीने नवीन मजुरी ठरविण्याची मागणी केली होती. आमदार हाळवणकरांसोबत शनिवारी झालेल्या बैठकीत कापडाच्या गाठीसाठी प्रतिटन रुपये ९५ तर सुताच्या बाचक्यांसाठी २ रु. ८० पैसे, सहाचाकी मालगाडीसाठी ६०० रुपये व दहाचाकी मालगाडीसाठी ९०० रुपये असा तोडगा सुचविला मात्र, त्यावेळी हमाल संघटनांनी तो फेटाळला होता.त्यानंतर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या रविवारच्या बैठकीत सरकारी नियमानुसार होणारी हमालीवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याबरोबर दोन्ही संघटनांची बैठक झाली. आमदार हाळवणकर यांनी कापडाच्या गाठीसाठी प्रतिटन ९७ रुपये, सुताच्या बाचक्यांसाठी २ रुपये ८० पैसे, सहाचाकी मालगाडीसाठी ७०० रुपये व दहाचाकी मालगाडीसाठी एक हजार रुपये असा तोडगा सुचविला. मात्र, ही भाववाढ ४२ टक्क्यांहून अधिक असल्याने ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने ती फेटाळली. यावेळी हमाल संघटनेचे धोंडिराम जावळे, यशवंत लाखे, शामराव कुलकर्णी, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे प्रदीप बहिरगुंडे, बाबूराव सोनाळे, राजाराम जगताप, संजय पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)