Kolhapur: दारू पिताना सापडला; घरात सांगेल या भीतीने वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 04:01 PM2023-10-23T16:01:57+5:302023-10-23T16:02:11+5:30
कोल्हापुरातील वृध्देच्या खुनाचा अवघ्या चार तासांत उलगडा, अभियंत्यास अटक
कोल्हापूर : दारू पिताना कॉलनीतील वृद्धेला दुसऱ्यांदा सापडल्यानंतर ती घरात सांगेल या भीतीने सिव्हिल इंजिनिअर तरुणाने डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला. लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय ६५, रा. संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर, कोल्हापूर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. सुभाषनगर येथील हॉरेब चर्चच्या भिंतीलगत शनिवारी (दि. २१) रात्री घडलेला खुनाचा प्रकार रविवारी (दि. २२) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी संशयित प्रतीक विनायक गुरुले (वय २२, रा. संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) याला अटक केली.
लक्ष्मी क्षीरसागर या मुलगा, सून, नातू आणि नात यांच्यासह सुभाष नगरातील रोहिदास कॉलनीत राहत होत्या. घरीच त्या चपला तयार करण्याचे काम करीत होत्या. शनिवारी रात्री आठच्या सुमारास नातीला दांडिया खेळण्यासाठी सोडायला त्या घरातून बाहेर पडल्या. रात्री दहापर्यंत घरी परतल्या नाहीत, त्यामुळे मुलाने त्यांचा शोध सुरू केला. परिसरात शोध घेऊन अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास मुलगा गणेश यांनी राजारामपुरी पोलिस स्टेशनमध्ये आई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरातील हॉरेब चर्चमधील दोन महिला कचरा टाकण्यासाठी मागच्या गेटने बाहेर आल्यानंतर भिंतीलगत वृद्धा पडलेली दिसली. समोरच्या मैदानात खेळत असलेल्या मुलांना याची माहिती दिल्यानंतर, त्या जवळच राहणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर असून, त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
१५ दिवसांपूर्वीच झाला होता वाद
सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला प्रतीक बेरोजगार आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याने प्रेमविवाह केला. त्याचे वडील पाटबंधारे विभागात लिपिक आहेत, तर आई गृहिणी आहे. १५ दिवसांपूर्वी तो दारू पिताना लक्ष्मी क्षीरसागर यांना सापडला होता. त्यांनी हा प्रकार प्रतीकच्या घरात सांगितला. त्यावरून जोरदार वाद झाला होता. पुन्हा घरात वाद होईल, या भीतीने त्याने वृद्धेला भिंतीवर ढकलून आणि डोक्यात दगड घालून खून केला.