सांगरूळच्या वेशीवर कोरोनाप्रतिबंधासाठी चौक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:38 AM2021-05-05T04:38:22+5:302021-05-05T04:38:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ : सांगरूळसह परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामपंचायतीने गावात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. गावातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरूळ : सांगरूळसह परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामपंचायतीने गावात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. गावातील औषध दुकाने व दूध संस्था वगळता सगळे व्यवहार बंद ठेवले असून, गावाच्या वेशीवर चौक्या उभ्या केल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच खात्री करून प्रवेश दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
करवीर तालुक्यातील मोठे व बाजारपेठेचे गाव असल्याने सांगरूळमध्ये परिसरातील दहा-बारा गावांचा राबता कायम असतो. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यात गेल्या आठ-दहा दिवसात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. यासाठी सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, ग्रामविकास अधिकारी पी. एम. बीडकर व सदस्यांनी एकत्रित येऊन गाव शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन दिवस अगोदर ग्रामस्थांना सूचना देऊन सोमवारपासून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. औषध दुकाने व दूध संस्था दोनच गोष्टी सुरू आहेत. रविवार (दि.९)पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. गावात येणाऱ्या चारही प्रवेशद्वारावर चौक्या उभारल्या आहेत. गावात येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाते. विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद दिला जात असल्याने गावात शुकशुकाट दिसतो.
‘सांगरूळच्या लॉकडाऊन पॅटर्नची पुनरावृत्ती
कोरोनाच्या मागील लाटेत सांगरूळने कडक लॉकडाऊन केले होते. लॉकडाऊनच्या सांगरूळ पॅटर्नची चर्चा त्यावेळी खूप झाली होती. त्याच धर्तीवर यावेळेलाही नियोजन केले आहे.