लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : यावर्षी केंद्र सरकारने एफआरपीत प्रतिटन २५० रुपये वाढ केली आहे. मात्र, तोडणी, वाहतूक यातून वजा होणार असल्याने यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपले ऊसतोडणी वाहतूक खर्च सादर केल्याने उतारे चांगले असून देखील यावर्षी दोन हजार ८००च्या वर प्रतिटन ऊसदर मिळणे अशक्य असल्याचे चित्र आहे. शेतकºयांना याही वर्षी ऊसदरासाठी संघर्ष अटळ आहे, अशा प्रतिक्रिया शेतकºयांतून व्यक्त होत आहेत.
एफआरपी ही मागील वर्षीचा साखर उतारा व ऊस तोडणी वाहतूक खर्च यावर अवलंबून असते. यावर्षी जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिटन साखर उतारे चांगले आहेत. उसाच्या पहिल्या ९.५ टक्के उताºयासाठी २५५० रुपये व पुढील प्रत्येक टक्क्यास २६८ रुपये अशी २०१७/१८ हंगामासाठी केंद्र शासनाने एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपीत २५० रुपये वाढ केल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे साखर उतारे चांगले असल्याने यावर्षी ऊसदराचा संघर्ष टळणार म्हणून ऊस उत्पादकात आनंद व्यक्त करण्यात येत असला तरी वास्तव वेगळेच आहे.
प्रतिटन साखर उतारा तपासणी केल्यास जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी ऊसदर ३३०० ते ३४५० प्रतिटन होत असला तरी यातून ऊस तोडणी वाहतूक वजा केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे तोडणी वाहतूक खर्च अलीकडेच साखर आयुक्तांना सादर झाले आहेत. यात सहकारी कारखान्यांनी प्रतिटन ५६० ते ६०० रुपये, तर खासगी कारखानदारांनी ६५० ते ७१० रुपये प्रतिटन दाखवले आहेत. ही ऊस तोडणी वाहतूकवजा जाता शेतकºयांना सरासरी २५५० ते २८०० रुपये प्रतिटन मिळणार असल्याने याहीवर्षी दरासाठी ऊस उत्पादकांना संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.यावर्षी गुरुदत्त व कुंभी कासारी या दोन कारखान्यांनी साखर उताºयात आघाडी व तोडणी वाहतूक खर्चात बचत केल्याने येथील ऊस पुरवठादारांना इतर कारखान्यांपेक्षा चांगला दर मिळणार आहे.मिळणारा ऊसदर एक्स फिल्ड नसल्याने ऊस उत्पादकांवर अन्यायकेंद्रीय कृषी मूल्य आयोग दरवर्षी जी ऊसदरासाठी एफआरपी जाहीर करते ती एक्स फिल्डऐवजी एक्स फॅक्टरी जाहीर करते. पहिल्या ९.५ टक्के उताºयासाठी २५५० व पुढील प्रत्येक १ टक्क्याला २६८ रुपये एफआरपी असून, कोल्हापूर जिल्ह्याची एकूण एफआरपी प्रतिटन ३२०० ते ३४०० रुपये होत असली तरी यातून वाहतूक खर्च वजा होणार आहे. जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम २०१६/१७ मध्ये वाहतूक खर्च किमान ५५० ते ७०० रुपये असल्याने उत्पादकांच्या हातात २९०० रुपयेच मिळणार आहेत.खासगी कारखान्यांचा खर्च सर्वाधिकजिल्ह्यातील सहकारी व खासगी कारखान्यांच्या ऊस तोडणी वाहतुकीची तुलना केली असता सहकारी कारखान्यांचे खर्च खासगी कारखान्यांपेक्षा कमी आहेत. सहकारी कारखान्यांचा ५५० ते ६०० रुपये ऊस तोडणी-वाहतुकीचा खर्च आहे, तर सर्वच खासगी कारखान्यांनी हा खर्च ६५० ते ७२५ रुपयांपर्यंत दाखवला असल्याने आपोआपच शेतकºयांना एफआरपीत फसविण्याचा खासगी कारखानदारांनी प्रयत्न केला आहे.