लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्लास्टरच्या गणेशमूर्तींवर बंदी आहे, दुसरीकडे शाडू मिळत नाही यावर मार्ग म्हणून कुंभारबांधवांनी गणेशमूर्ती बनविण्यासाठी धरणांमधील माती मोफत न्यावी, त्यासाठी कोणतीही रॉयल्टी द्यावी लागणार नाही. ज्या धरणांची माती हवी आहे त्यांची तालुकावार यादी द्या, तहसीलदारांना त्याबाबतचे आदेश दिले जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी कुंभारबांधवांना दिली.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना बंदी करू नये या मागणीसाठी श्री संत गोरा कुंभार मूर्तिकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पाठिंबा देत खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. त्यांनी शिष्टमंडळाला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत या प्रश्नांची चर्चा केली.
यावेळी मारुतराव कातवरे म्हणाले, प्लास्टरने प्रदूषण होत नसतानाही या मूर्तींवर केंद्राने बंदी घातली आहे. दुसरीकडे शाडूच्या उत्खननावर बंदी आहे, एका मूर्तीकाराला किमान ५०० ब्रास माती लागते. अशा परिस्थितीत आम्ही गणेशमूर्ती कशा बनविणार, त्यामुळे हजारो कुंभार बेरोजगार होतील. उपाध्यक्ष प्रकाश कुंभार, सतीश कुंभार, शिवाजी वडणगेकर, संभाजी माजगांवकर यांनीही यासंबंधी भूमिका मांडली.
यावर जिल्हाधिकारी म्हणाले, मातीची कमतरता असेल तर धरण, पाझर तलाव येथील माती नेण्यास काही अडचण नाही. धरणाच्या भिंतीपासून काही अंतर सोडून मागील बाजूची हवी तेवढी माती मोफत न्या, ज्या ठिकाणची माती हवी आहे तेथील धरणांची तालुकावार यादी द्या तसे आदेश तहसीलदारांना दिले जातील. यावेळी नगरसेवक राहुल चव्हाण, उदय कुंभार, बबन वडणगेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
गणेशमूर्तीही आंदोलनात..
या मोर्चात गणेशमूर्तीच ट्रॅक्टरवरून आणली होती. गणपतीची वेशभूषा करून आलेला कार्यकर्ता ‘३६५ दिवस माझ्यामुळेच प्रदूषण होते काय’ ही पाटी घेऊन उपस्थित होता. ‘मी मूर्तिकार’ लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घालून पाच हजारांवर कुंभारबांधव मोर्चात सहभागी झाले. हलगीच्या कडकडाटात ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘लढाई माझ्या अस्तित्वाची’, ‘एका निर्णयाने लाखो मूर्तीकार बेरोजगार’,‘पीओपीवरील बंदी हटवा, गणेशोत्सव वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
---
पर्यावरणमंत्र्यांसोबत बैठक
प्लास्टरवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र आणि काहीअंशी राज्य शासनाच्या हातात आहे. त्यामुळे खासदार मंडलिक यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची वेळ घेऊन चर्चा करू, असे सांगितले. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्लास्टरने प्रदूषण होत नाही याची माहिती कागदपत्रांनिशी प्रदूषण नियंत्रण मंडळाला आणि जिल्हा प्रशासनाला द्या, अशी सूचना केली. आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढील आठवड्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठकीचे नियोजन करू, असे आश्वासन दिले.
---
फोटो नं २११२२०२०-कोल-कुंभार०१,०२
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी श्री संत गोरा कुंभार मूर्तिकार संघाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)
--
०३
मोर्चात गणपतीची वेशभूषा करून एक कार्यकर्ता आंदोलनात सहभागी झाला होता. (छाया : नसीर अत्तार)
----
०४
मोर्चासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्तीदेखील आणण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार)
---
इंदुमती गणेश