कोल्हापूर : मिरज- कळंबी रस्ते कामाचा ठेका तातडीने रद्द करुन बोगस ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. बोगस ठेकेदाराच्या जोखंडातून या रस्त्याला स्वातंत्र्य मिळवून द्या, अशी मागणी सांगलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रणित रस्ते, साधन- सुविधा व आस्थापना आघाडीने सोमवारी केली.
या मागणीसाठी कोल्हापुरातील उजळाईवाडी येथील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर या आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मनसेसांगली जिल्हा संघटक संकेत झुरे, शहर अध्यक्ष विनय पाटील,सागर चव्हाण, सागर सुतार, अरविंद कांबळे, सतीश येताळ, आकाश पाटील, प्रशांत हेरवाडे, सौरभ पाटील, अजय खांडेकर, प्रसाद हेरवाडे, आदी सहभागी झाले.
मिरज- कळंबी या रस्ते कामाचा ठेकेदार कंपनीने कामशेत व मिरज येथे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंपनीस तात्काळ काळ्या यादीत टाकावे.या कंपनीचा व्यवसाय परवाना तातडीने रद्द करण्यात यावा.संबंधित ठेकेदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या ६ महिन्यांपासून मनसे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्र व्यवहार करत आहे. मात्र संबंधित कार्यालयाकडून ठेकेदारास पाठीशी घातले जात असून याच्या निषेधार्थ स्वातंत्र्य दिनी धरणे आंदोलन करण्यात आले असल्याचे संकेत झुरे आणि विनय पाटील यांनी सांगितले.