कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत आमदार जाधव यांनी आयुक्त डॉ. कलशेट्टी आणि अधिकाऱ्यांसह व्यापक आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी सध्या सुरू असलेल्या पॅचवर्कच्या कामाची माहिती दिली. तसेच मुख्य रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी एक कोटी ६२ लाखांच्या कामाची निविदा १९ तारखेपर्यंत अंतिम होऊन लवकरच ही कामे सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. या वर्षीची मंजूर निधीतील कामेही सुरू करण्याबाबत ठेकेदारांना सूचना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले .शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेचा टप्पा २ साठी राज्य शासनाकडे १७८ कोटींचा प्रस्ताव सादर केलेला आहे. कळंबा येथील साईमंदिर ते नवीन वाशीनाका या रिंग रोडच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे, असे सांगितले.सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ डांबरही न पाहिलेल्या आणि सर्वाधिक अवजड वाहनांची वाहतूक असणाऱ्या शिवाजी उद्यमनगर आणि लक्ष्मीपुरी परिसरातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
यासह वाय. पी. पोवारनगर या तीनही वसाहतीमधील मुख्य आणि अंतर्गत रस्ते नव्याने करण्यासाठी १७८ कोटींचा प्रस्ताव आपण तो मंजूर करून आणू, अशी ग्वाही देत आमदार जाधव यांनी यासाठी प्रशासनाने कोणत्याही त्रुटी न राहणारा प्रस्ताव अंतिमरीत्या सादर करावा, अशी आग्रही सूचना ही दिली.रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी ती संबंधित कनिष्ठ अभियंता, उपशहर अभियंता यांच्या देखरेखीखाली करा, असेही आ . जाधव यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक संभाजी जाधव, कनिष्ठ अभियंता, आदी उपस्थित होते .