गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या विकास निधीतून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून दिली. या शववाहिकेची चावी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी यांच्याहस्ते नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज उपविभागात कोरोना रूग्ण व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड मृतांवर गडहिंग्लजमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी शववाहिकेची गरज होती. मंत्री मुश्रीफ यांनी पालिकेच्या मागणीची दखल घेवून तातडीने शववाहिका दिली. शहरवासीयांच्यातर्फे मी त्यांचे आभार मानते.माजी उपनगराध्यक्ष किरण कदम म्हणाले, यापूर्वी मुश्रीफ यांनी आपल्या फौंडेशनतर्फे गडहिंग्लज पालिकेला रूग्णवाहिका दिली होती. त्यानंतर आता शववाहिका देखील दिली. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील जनतेची गैरसोय दूर झाली.यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, नगरसेवक हारूण सय्यद, रेश्मा कांबळे व सुनिता पाटील, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष गुंड्या पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शर्मिली पोतदार, सुरेश कोळकी, शारदा आजरी, तुषार यमगेकर, उदय परीट, संतोष कांबळे, अमर मांगले, चंद्रकांत मेवेकरी, राजू जमादार आदी उपस्थित होते. मुश्रीफांची तत्परता..!शववाहिका नसल्यामुळे एका कोविड रूग्णाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी डंपरमधून नेण्याची वेळ आली होती. त्यामुळे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगराध्यक्षा प्रा. कोरी यांनी महिन्यापूर्वी गडहिंग्लज येथील आढावा बैठकीत केली होती. त्याच बैठकीत त्यांनी आपल्या फंडातून शववाहिका देण्याची घोषणा केली होती. महिन्याच्या आत त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता केली.