मोफत गॅस कनेक्शनने दहा हजार कुटुंबांचे भविष्य ‘उज्ज्वल’
By admin | Published: January 9, 2017 12:51 AM2017-01-09T00:51:03+5:302017-01-09T00:51:03+5:30
केंद्र सरकारची योजना : पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर; कंपन्यांच्या माध्यमातून वितरकांनी जोडणी सुरू केली
प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर
केंद्र सरकारच्या पुढाकाराने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘उज्ज्वल’योजनेंतर्गत जिल्ह्यातील दहा हजार कुटुंबांना लाभ होणार आहे. त्यांना गॅस कनेक्शन देण्याचे काम गॅस कंपन्यांच्या माध्यमातून वितरकांनी सुरू केले आहे.
चुलीच्या धुरामुळे होणारा आरोग्यावर परिणाम, पर्यावरण व सुरक्षेचा विचार करून साधारण आठ महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील प्रमुख महिलेच्या नावे एलपीजी गॅस कनेक्शन देण्याऱ्या ‘उज्ज्वल’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेची पुढील कार्यवाही सुरू झाली असून, प्रत्येक तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये कुणाकडे गॅस कनेक्शन आहे, त्याचबरोबर इतरही माहिती घेण्यात आली. त्यानंतर या सर्व्हेच्या आधारावर गॅस कंपन्यांनी डिसेंबर महिन्यात जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार गॅस कनेक्शनचा कोटा जाहीर केला. कोटा जाहीर करण्यापूर्वी तो किती द्यायचा, त्याला काय निकष असावेत व प्राधान्य कशाला द्यावे, हे गॅस कंपन्या ठरवत आहेत. त्यानंतरच ते कोटा जाहीर करीत आहेत. जिल्ह्यातील दहा हजार लाभार्थ्यांचा आकडा हा पहिल्या टप्प्यातील आहे.
या लाभार्थ्यांना कनेक्शन द्यायला सुरुवात झाली आहे. त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विहीत नमुन्यातील माहिती भरून घेऊन मोफत कनेक्शन दिले जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात केरोसिन संकल्पनेच्या दृष्टीने केंद्र सरकारची ‘उज्ज्वल’ही योजना फायदेशीर आहे. गोरगरिबांचे आरोग्यदायी, पर्यावरण व सुरक्षा या दृष्टीने जीवनमान उंचाविण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या गॅस एजन्सीकडे आहेत. त्या आधारेच टप्प्या-टप्प्याने लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जात आहे. तरी संबंधितांनी एजन्सीशी संपर्क साधावा. पुरवठा विभाग गॅस कंपन्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करीत आहे.
- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी