समतेचा संदेश देणारा यमगेतील सरनोबतांचा गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:48+5:302021-09-15T04:28:48+5:30

शेकडो वर्षांची परंपरा अनिल पाटील मुरगूड : विभक्त कुटुंब पद्धतीने एकत्र कुटुंबव्यवस्थेची शकले पडली असताना, सण-समारंभांमधून एकत्र येण्याची वृत्ती ...

Ganapati of Sarnobat in Yamage conveying the message of equality | समतेचा संदेश देणारा यमगेतील सरनोबतांचा गणपती

समतेचा संदेश देणारा यमगेतील सरनोबतांचा गणपती

Next

शेकडो वर्षांची परंपरा

अनिल पाटील

मुरगूड : विभक्त कुटुंब पद्धतीने एकत्र कुटुंबव्यवस्थेची शकले पडली असताना, सण-समारंभांमधून एकत्र येण्याची वृत्ती हळूहळू लोप पावत आहे; पण याला अपवाद कागल तालुक्यातील यमगे या गावातील सरनोबत कुटुंब आहे. शेकडो वर्षांपासून सुमारे दोनशे सदस्य असणाऱ्या या कुटुंबात एकच गणपती बसवला जातो. सर्व धार्मिक विधी सर्वजण एकत्र येऊन अगदी उत्साहात साजरे करत आहेत. समतेचा, एकतेचा संदेश देणारा सरनोबतांचा गणपती विभक्त कुटुंब व्यवस्थेला नक्कीच मार्गदर्शक आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात मुळात लोकांनी एकत्र यावे, आचार-विचारांची देवाण-घेवाण व्हावी, यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली; पण वेगाने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेत हा मूळ हेतू मात्र दूर जाताना पाहावयास मिळत आहे. पण याच विचाराने यमगे येथील सरनोबत कुटुंबात गणेश उत्सवाच्या सुरुवातीपासूनच सुमारे दोनशे सदस्य असणाऱ्या कुटुंबामध्ये एकच गणपती बसवण्याची प्रथा अखंडित आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर असलेले काही लोक गणेश उत्सवामध्ये एकत्र येतात.

सरनोबत गल्ली येथील सदाशिव दत्तात्रय सरनोबत पाटील यांच्या घरी अगदी विधिवत पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गावातीलच कुंभार समाजाकडून धान्य देऊन तीन ते चार फुटाची शाडूची आकर्षक मूर्ती बनवून घेतली जाते. गणेशाच्या आगमनासाठी सुमारे पन्नास ते साठजण एकत्रित गणेशाचा जयजयकार करत जाऊन डोक्यावरून गणेश मूर्ती आणतात. गणेशाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत घरातील सर्वच सदस्य एकत्र येत अत्यंत उत्साहात आरती करतात. यावेळी आणलेल्या प्रसादामध्येसुद्धा विविधता पाहावयास मिळते. गावातील तलावात अगदी साध्या पद्धतीने या गणपतीचे विसर्जन होते.

Web Title: Ganapati of Sarnobat in Yamage conveying the message of equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.