गर्दी टाळण्यासाठी आता कोल्हापूरचे गणेश दर्शन ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:23 AM2021-09-13T04:23:48+5:302021-09-13T04:23:48+5:30

कोल्हापूर : कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे दर्शन ऑनलाईन करण्याकडे शहरातील मंडळांचा कल ...

Ganesh Darshan of Kolhapur is now online to avoid crowds | गर्दी टाळण्यासाठी आता कोल्हापूरचे गणेश दर्शन ऑनलाईन

गर्दी टाळण्यासाठी आता कोल्हापूरचे गणेश दर्शन ऑनलाईन

Next

कोल्हापूर : कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे दर्शन ऑनलाईन करण्याकडे शहरातील मंडळांचा कल आहे. यासाठी फेसबुक लाईव्ह, इन्स्टाग्राम, विविध ॲपचा वापर करण्यात येणार आहे. पण पहिल्यांदाच अशी यंत्रणा उभी करावी लागणार असल्याचे मंडळासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, महापालिका आणि सेवा इन्फोटेकतर्फे इझी कोल्हापूर ॲपद्वारे येत्या बुधवारपासून शहरातील ऑनलाईन गणेश दर्शन करण्यात येणार आहे.

लाडक्या बाप्पाचे आगमन घराघरात झाले आहे. मोठ्या उत्साहात, आनंदात घरात आणि सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पण कोरोना आजाराचा संसर्ग कायम असल्याने गर्दीने गणेश दर्शन करण्यावर मर्यादा आली आहे. सहकुुटुंब गावी किंवा नातेवाइकांकडे जाणे शक्य नाही. अशा वेळी टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन दर्शन घेण्याची सोय करणे शक्य आहे. यासाठी ॲप्लिकेशन्स, व्हिडिओ कॉल्स किंवा लाइव्ह फिचर वापरता येतात. त्याची तयारी मंडळांनी केली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार मंडळेही हायटेक होत आहेत.

चौकट

सरकार, प्रशासनाचे निर्बंध

कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी गणेश मंडळांनी प्रतिष्ठापना केलेली मूर्ती, देखावे पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेट देण्यावर सरकार आणि जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. थेट गणेश दर्शन बंदी केली आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजकांना ऑनलाइन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शन उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धडपड सुरू झाली आहे. कोरोनामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक मंडळांनी भव्य, दिव्य देखाव्यांना फाटा देत केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना करणे पसंत केले आहे.

चौकट

फेसबुक लाईव्ह सहज शक्य

अँड्राॅईड मोबाईल असणाऱ्या बहुतांशी जण फेसबुक वापरतात. फेसबुक ‘रूम’ या फिचरद्वारे गणेश दर्शन ऑनलाईन होऊ शकते. हे फिचर वापरून आपल्या सर्व मित्रांबरोबर किंवा अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचता येते. या रुममध्ये हव्या त्या लोकांना ॲड करता येते. तुम्ही तत्काळ लाइव्ह न जाता थोड्या वेळाने जाणार असाल तरीही फेसबुक रुम तयार करून ठेवता येते.

कोट

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी घरबसल्याही गणेश दर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येईल.

कपिल चव्हाण, अध्यक्ष, राधाकृष्ण तरुण मंडळ, कोल्हापूर

गणेश दर्शन ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. फेसबुक, व्हॉट्स-ॲपसह विविध ॲप्लिकेशनचा वापर करण्यात येईल. ऑनलाईन गणेश दर्शन करताना काही अडचणी येणार आहेत; पण कोरोना टाळण्यासाठी ऑनलाईनवरच भर दिला जाईल.

संजय पाटील, शाहूपुरी गणेश युवक मंडळ, कोल्हापूर

Web Title: Ganesh Darshan of Kolhapur is now online to avoid crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.