कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार कोठावळे यांनी दिली.गेल्या ४८ वर्षे मंडळाने देशातील विविध मंदिरे आणि महल यांच्या हुबेहुब प्रतिकृती सादर करून गणेशभक्तांमध्ये एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, उत्तर कर्नाटक, गोवा आदी ठिकाणाहून खास कोल्हापुरातील या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त प्रतिवर्षी हजेरी लावतात.
विशेष म्हणजे एकाच प्रकारची गणेशमूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्ये असून त्याच्या दर्शनाकरिताही भक्तांची सकाळी व सायंकाळी हजेरी असते. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मंडळाने दीड दिवसांचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
या कालावधीत गणेशमूर्तीचे ऑनलाईन दर्शन, धार्मिक विधी, आरती सुविधा शासनाचे नियम पाळून केली जाणार आहे. भक्तांकडून फळे, फुले, प्रसाद,नैवैद्य स्वीकारले जाणार नाहीत तर वर्गणीही मागितली जाणार नाही. यानिमित्त राजारामपुरी दुसरी गल्ली येथे उभारण्यात आलेल्या फलकाचे अनावरणही मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी नंदकुमार मगदूम, हणमंत पवार, प्रदीप काटे, विलास मुदगल, राजेश मांडरेकर, मंगेश लिंग्रस, अनिल कोळेकर, दुग्रेश लिंग्रस, हेमंत भोसले, आशिष काटे, प्रथमेश भोसले, अक्षय बुरसे, अजिंक्य मुदगल, आदी उपस्थित होते.ओळी : कोल्हापुरातील राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या फलकाच्या अनावरणप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)