कोल्हापुरातील कळंबा कारागृहात पुन्हा सापडला गांजा, मोबाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:52 PM2024-04-09T12:52:30+5:302024-04-09T12:52:59+5:30
गांजा पुरवण्याचा नवा फंडा
कोल्हापूर : कळंबा कारागृहात तंबाखूच्या पुड्यांमध्ये लपवून कैद्यांना गांजा पुरवला जात असल्याचा प्रकार सोमवारी (दि. ८) उघडकीस आला. कारागृहाची झडती घेताना सर्कल क्रमांक आठमध्ये कचरा कुंडीत सापडलेल्या तंबाखूच्या पुड्यांमधील २१४ ग्रॅम गांजा कारागृह पोलिसांनी जप्त केला. तसेच, सर्कल क्रमांक पाचच्या बरॅक क्रमांक एकमागे एक मोबाइलही पोलिसांना मिळाला. याबाबत अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सहकारी कर्मचाऱ्यांसह कारागृहाची झडती घेत होते. बरॅक क्रमांक आठमध्ये कचरा कुंडीची झडती घेताना त्यांना तंबाखूच्या १३ पुड्या आढळल्या. एकाच वेळी मोठ्या संख्येने पुड्या आढळल्यामुळे तपासणी केली असता, त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत त्यांनी कैद्यांकडे चौकशी केली. मात्र, पुड्या टाकल्याची कबुली कोणीच दिली नाही. देवकर यांनी २१४ ग्रॅम गांजा असलेल्या पुड्या जप्त केल्या. तंबाखूच्या पुड्यांमधून कारागृहात पोहोचलेला गांजा कोणी आणि कोणासाठी पाठवला होता, याचा शोध घेण्याचे आव्हान कारागृह पोलिसांसह जुना राजवाडा पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
तत्पूर्वी सकाळी अकराच्या सुमारास सर्कल क्रमांक पाचमधील बरॅक क्रमांक एकच्या मागे तपासणी करताना तुरुंग अधिकारी अविनाश भोई आणि हवालदार सीताराम काळभर यांना काळ्या रंगाचा एक मोबाइल आढळला. बॅटरी, सिम कार्डसह असलेल्या मोबाइलबद्दल त्यांनी कैद्यांकडे विचारणा केली. मात्र, मोबाइल कोणी टाकला, याची माहिती मिळाली नाही. मोबाइल आणि गांजा जप्त करून कारागृह अधीक्षकांच्या सूचनेनुसार भोई यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
गांजा पुरवण्याचा नवा फंडा
यापूर्वी बॉल, रिकाम्या बाटल्या आणि कागदाच्या पुड्या बांधून कारागृहाच्या भिंतीवरून गांजा आत फेकला जात होता. सध्या कारागृहाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याने भिंतीवरून गांजा टाकण्याऐवजी तंबाखूच्या पुड्यांमधून पाठवण्याचा मार्ग अवलंबल्याचे दिसत आहे. यात कारागृहात किराणा माल पुरवणारा आणि विक्री करणारा ठेकेदार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.