उत्तूर : गेल्या महिन्याभरात रात्रीच्यावेळी अज्ञात माथेफिरूने बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ग्रामस्थांच्या गवताच्या गंजी व खोपी पेटविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. चार दिवसांतून एक तरी गवताची गंजी व खोप जाणूनबुजून पेटविली जात आहे. सतत होत असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माथेफिरूचा तातडीने शोध घ्यावा, अशी येथील शेतकºयांची अपेक्षा आहे.सध्या शेतकरी उन्हाळ्यातील चाºयासाठी गवताच्या गंजी रचून ठेवत आहेत, तर शेतातील व गावातील खोपीत शेतीची अवजारे, जळण ठेवले जात आहे, ते माथेफिरू जाळत आहे. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आठवड्यातून दोन ते चार तरी आगीचे प्रकार घडत आहेत. बंद घरांनाही माथेफिरू लक्ष्य करतो. रात्री अकरापूर्वी लागलेल्या आगी ग्रामस्थांनी विझविल्या आहेत. या माथेफिरूला ग्रामस्थ पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना अद्याप तो हाती लागलेला नाही. पहाटे चारपर्यंत केव्हाही तो आग लावून पसार होत आहे. आगीमुळे चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावात मोठा अनर्थ केव्हाही घडू शकतो, अशी भावनाही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.शोध सुरूचमाथेफिरूकडून सुरू असलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. त्याचा पोलीसही शोध घेत आहेत. तरी ग्रामस्थांनी हे कृत्य जो कोणी करीत असेल त्याचे नाव पोलिसांना सांगावे. त्याचे नाव सांगणाºया व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही उत्तूर पोलीस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार पांडुरंग दोरुगडे यांनी दिली आहे.
बहिरेवाडीत गंजींना अज्ञातांकडून आगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:11 AM