कोल्हापूर : गोकुळमध्ये दूध उत्पादकांना ३,१३,२३ तारखेला दूधाची बिले देत असल्याचे सत्तारूढ गट सांगत आहे. गवळी देखील दहा दिवसाला पैसे देतात, तुम्ही काय वेगळे करता. पैसे नाही दिले तर दूध कोण घालणार? शेणा मुतात राबणाऱ्या मायमाऊलीच्या घामाचे ते पैसे आहेत, ते दिले म्हणजे काय उपकार करता का? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.गोकुळला वैभव मिळवून द्यायला ते गेले होते कोठे? अशी विचारणा सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी केल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैभवाचा विषयच येथे नाही, ते म्हणतात ३,१३,२३ ला बिले देतो, गवळीसुध्दा दहा दिवसाला बिले देतात. पैसे दिले नाहीतर त्याला दूध कोण घालणार.
आम्ही ऊसाची एफआरपी देतो म्हणजे काय उपकार करतो का? बिले देणे त्यांचे कामच आहे. मूळात गोकुळमधील गैरव्यवहार किती दिवस चालणार, आपण उघड्या डोळ्याने किती दिवस बघायचे? म्हणून आमचा सकारात्मक प्रचार आहे. एकदा गोकुळ आपल्या हातात द्या आम्ही खर्च कमी करून पारदर्शीपणे कारभार करू.
पाच-सहा वर्षापुर्वी १३६ कोटी संचित तोट्यात असलेली जिल्हा बँक १५० कोटीच्या नफ्यात आणली, त्याप्रमाणे अतिशय पारदर्शी कारभार करून देशातील २७ व्या क्रमांकावर असणारा गोकुळ अमूलबरोबर काम करेल. लिटरला दोन रूपये जादा दिले नाहीतर पुढच्या निवडणूकीत शेतकऱ्यांनी दारात उभे करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.